पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून अरबी समुद्रात धडकणार

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. यावर्षी ‘असनी’ चक्रीवादाळामुळे वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला आहे.तसंच अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अरबी समुद्रात पोहोचणार आहे. यादरम्यान देशातील पूर्वीकढील भागात आणि दक्षिणेकडील काही राज्यांत जोरदार पूर्वमोसमी पाऊस होत असून आता पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तसंच १७ मे पर्यंत मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती गेली नव्हती परंतु १८ मे उत्तर-पूर्व दिशेने बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे. यामुळे लवकरच पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरासह दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर यावर्षी सहा दिवस आधी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला.

याचबरोबर महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी आहे.पुढील दोन ते तीन दिवसामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसंच पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात २१ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Nilam: