पुणे : मन शुद्धता हा विषय विद्यापीठ पातळीवर चर्चिला जाऊ शकतो. या विषयाला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कशाप्रकारे आणता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. या विषयामुळे संपूर्ण मानव जात ही सुख, शांती आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकेल, असे प्रतिपादन जागतिक कीर्तिचे संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू)च्या एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटी, पुणे तर्फे प्रथमच जागतिक दर्जाची ‘कॉन्शियसनेसः द अल्टिमेट रियॅलिटी’ विषयावर कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मा. महंत योगी अमरनाथ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटीचे संचालक डॉ. जयंत खंदारे, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले, मानवी जीवनात येणारी अनेक संकटे हे शुद्धतेच्या परिभाषेेने टाळता येऊ शकतात. त्यामुळे मानवी मन सदैव चैतन्यमय राहिल. वर्तमान काळ पाहता या विषया संदर्भातील परिषद ही देशातील सर्व शाळा व महाविद्यालयात घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना याचे अनिवार्य शिक्षण द्यावे. कॉन्शियसनेसमध्ये उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त होते. वैदिक ज्ञान, चार उपनिषेद आणि उपवेद यात संपूर्ण जगाच्या अस्तित्वाचे ज्ञान समाविष्ठ आहे. स्वअनुभव घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चैतन्य स्वरूपात जाणे. या भूतलावर अध्यात्माचा अनुभव घेणे हे एक अलौकिक सत्य आहे. मोबाइल सारख्या साधनामुळे संपूर्ण जगाचे ज्ञान मिळत आहे. ब्रम्हांडाचे सत्य जाण्यासाठी त्याचा उपयोग करावा. त्याकरिता अनेक भाषेचे ज्ञान असावे. या विश्वाकडे वैदिक दृष्टिकोनातून पाहण्याची आज गरज आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, अविनाशी आत्मा आणि मनाचे खरे स्वरूप कळाल्यानंतर जीवन सुखमय होते. ओम आणि योग हे दोन शब्द सर्वात महत्वाचे असून तेच शांतीचे सर्वात मोठे सूत्र आहे. अद्वैत ज्ञान हे विज्ञानाचे तत्वज्ञान आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितलेले ज्ञान, कर्म, आत्मा आणि मनाचे स्वरूप हे जगातील कोणत्याही प्रयोगशाळेत सापडणार नाही. या परिषदेच्या नंतर जगातील कोणत्याही विज्ञान परिषदेत आध्यात्मिक व्यक्तींना उंच दर्जाचे असे स्थान मिळेल. सद्गुणांची पूजा हीच ईश्वर सेवा आहे.
डॉ. दीपक रानडे म्हणाले, भारतीय तत्वज्ञानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून सुख आणि आनंद प्राप्त होतो. संत ज्ञानेश्वर यांनी सांगितलेले सत्य हे अंतिम आहे. चर्चासत्रात डॉ. अॅलेक्सी हॅकी, डॉ. यूलिसी डी क्रोपो व स्वामी राधिकानंद सरस्वती, डॉ. के रघू, आनंदी रविनाथ व डॉ. रामकृष्ण भट, महंत योगी अमरनाथ, विवेक सावंत आणि डॉ. मिलिंद पात्रे यांनी विचार मांडले. डॉ. जयंत खंदारे यांनी प्रास्ताविक, प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. सुमन कौल यांनी आभार मानले.