भोपाळ : मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आईपणाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जगात आईच्या प्रेमाला महत्वाचे स्थान आहे. इंदूरमधील एका आईनं आपलं 15 दिवसांचं नवजात बालक विकून, मिळालेल्या पैशातून फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन अशा वस्तू खरेदी केल्या आहेत. आरोपी आईनं पतीच्या संमतीनं हा व्यवहार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार इंदूरच्या हीरा नगर भागात राहणाऱ्या शायना बी नामक महिलेनं पोलिसांना सांगितलं की, पतीला आमच्या बाळावर संशय होता. त्यामुळं पतीला माझा गर्भपात करायचा होता, पण आमच्याकडं वेळ खूप कमी असल्यानं आम्ही दलालांमार्फत मूल विकण्याचा बेत आखला. त्याप्रमाणे पतीच्या सहमातीने हे बाळ विकण्यात आले आहे.
पुढे ती म्हणाली, आम्ही आमचं बाळ देवास येथील एका जोडप्याला विकलं. हे मूल लीना नावाच्या महिलेनं विकत घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. लीना म्हणाली की, अलीकडंच तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं तिनं मुलाला साडेपाच लाखांना विकत घेतलं.