सावधान! पुण्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचे थैमान

पुण्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचे थैमान

राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी सर्वत्र साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांचे स्वास्थ बिघडल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कीटकजन्य आजारांवरील औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.

ससून रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांमध्ये कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये चिकुनगुनियाचे ४०० रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात आंतररुग्ण विभागातील ८०१ रुग्ण, तर बाह्यरुग्ण विभागातील ४१६ अशा एकूण १२१७ रुग्णांची चिकुनगुनियासाठी तपासणी करण्यात आली. बहुतांश रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, थकवा अशी लक्षणे दिसून आली आहेत. अर्धांगवायू, न्युरॉलॉजिकल गुंतागुंत अशी नवीन लक्षण आढळल्याचे प्रमाण नगण्य आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात दररोज १८०० ते २००० रुग्ण बाह्यरुग्ण विभागांमध्ये उपचारांसाठी येतात. यंदा शहरात चिकुनगुनियाचे प्रमाण वाढल्याने खासगी आणि शासकीय रुग्णालयांना रुग्णांची बारकाईने नोंद करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या. चिकुनगुनियाची लक्षणे बदलल्याचे दिसून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यानुसार, ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणा-या चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद ठेवण्यात आली आहे.

Rashtra Sanchar: