संशोधन निष्कर्ष
शरीरातील प्राणवायू पातळी आणि हृदयगतीमध्ये सुधारणा, थकवा, अशक्तपणा, अंगदुखी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यात अडचणी, उपचारात्मक समस्या, नैराश्य कमी होणे, सकारात्मक विचारसरणीमध्ये चांगले बदल, व्यक्तिसापेक्ष लक्षणांमध्ये सुधारणा आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन शारीरिक हालचालींवर सकारात्मक परिणाम होतो, असा निष्कर्ष सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे केलेल्या या संशोधन अभ्यासाद्वारे दिसून आला आहे. www.sursmt.com या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे.
पुणे : कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराने मागील दोन वर्षांत जगात धुमाकूळ घातला व लाखोंच्या संख्येने लोकांचे प्राण गेले. भारतीय संगीतोपचार सूरांचे प्रणेते डॉ. शशांक कट्टी यांनी सूर संजीवन आणि बायनॉरल बीट्स या तत्त्वांचा वापर करून ‘वात’, ‘पित्त’ यांची ऊर्जा वाढवून कफ पातळ करणे, तो सहज बाहेर येणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविणे व त्यांचे कार्य सुधारणे अशा गोष्टींचा सखोल विचार करून तयार केलेल्या सुरावली पर्जन्य या प्रोटोकॉल उपचारात्मक संगीताचा वापर करून कोविड पश्चात रुग्णांची क्षमता व इतर प्रभाव पाहण्यासाठी प्रोटोकॉल उपचारात्मक संगीत पद्धतीवर आधारित हा संशोधन अभ्यास केला गेला आहे.
कोविडनंतर दवाखान्यात उपचार घेऊन किंवा घरीच विलगीकरण करून बरे झालेले रुग्ण यांच्यावर संगीतोपचाराद्वारे झालेले बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी, तसेच या प्रकारच्या उपचारांना मान्यता आणि शास्त्रीय पार्श्वभूमी असावी यासाठी डॉ. शेखर आंबर्डेकर यांनी दिलेल्या मापदंडानुसार एक उपचारक आणि एक त्यासारखेच वाटणारे (प्लॅसिबो), असे दोन प्रकारचे संगीत बनवून त्याचा तुलनात्मक अभ्यास संगीतोपचाराच्या पदविका प्राप्त अशा डॉक्टर्स आणि संगीत तज्ज्ञांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतील ४० रुग्णांवर नुकताच या संगीतोपचाराचा एक यशस्वी प्रयोग केला.