नवी दिल्ली : (Ind Vs Aus 2nd Test 2nd Day) ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लयॉनने भारताची टॉप ऑर्डर केएल राहुल (17), रोहित शर्मा (32), चेतेश्वर पुजारा (0) खिशात टाकली. यामुळे भारताची अवस्था 3 बाद 54 धावा अशी झाली. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र लयॉनने हा प्रयत्न देखील हाणून पाडला. त्याने अय्यरची 4 धावांवर शिकार करत भारताला चौथा धक्का दिला.
यानंतर लोकल बॉय विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र टॉड मर्फीने जडेजाला 26 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.
सर्व मदार विराट कोहलीवर असताना कूहमनने त्याला 44 धावांवर पायचीत पकडले. तिसऱ्या अंपायरचा हा निर्णय वादग्रस्त ठरला मात्र भारताचे नुकसान होऊन गेले. यानंतर लयॉनने पुन्हा आपला जल्वा दाखवत श्रीकार भरतला 6 धावांवर बाद केले आणि आपला पंजा पूर्ण केला. लयॉनने भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक देखील पूर्ण केलं आणि निम्मा भारतीय संघ तंबूत पाठवला.
ऑस्ट्रेलिया भारतावर निदान शंभरची आघाडी घेईल असे वाटत होते. मात्र भारताची खोलवर असलेली फलंदाजी पुन्हा एकदा कामाला आली. भारताची अवस्था 7 बाद 139 धावा अशी झाली असताना अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली.
अक्षरने डोक्यावर बसलेल्या कांगारूंच्या गोलंदाजांविरूद्ध दांडपट्टा सुरू करत झपाट्याने धावा केल्या. त्याला अश्विनने चांगली साथ दिली. अक्षरने कसोटी क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण करत भारताला 139 वरून थेट 250 पार पोहचवले. सध्या अक्षर पटेल 68 धावांवर खेळत असून त्याला अश्विनची भक्कम साथ आहे.