नवी दिल्ली : (Ind vs Aus Test And ODI Series Squad Announced) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात कोणताही बदल केल्या गेला नाही. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि रवींद्र जडेजा यांचे वनडेत पुनरागमन झाले आहे. उनाडकटने भारताकडून शेवटचा वनडे नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्याचवेळी जडेजाने अखेरचा वनडे सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
कसोटी संघात कोणताही बदल झालेला नाही. हाच संघ पहिल्या दोन कसोटींसाठी निवडला गेला होता. मात्र एक बदल दिसून येत आहे तो म्हणजे राहुलच्या नावासमोर लिहिलेला उपकर्णधार काढून टाकण्यात आला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ आला तेव्हा राहुलच्या नावासमोर उपकर्णधार असे लिहिले होते. उर्वरित दोन कसोटींमध्ये फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला उरलेल्या दोनपैकी एक कसोटी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन अंतिम दोन कसोटी सामन्यांसाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जूनमध्ये ओव्हल येथे खेळल्या जाणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर केएल राहुलला प्राधान्य न देत हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. कौटुंबिक कारणांमुळे रोहित शर्मा वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली. अशा स्थितीत हार्दिक पहिल्या वनडेत संघाची कमान सांभाळणार आहे.
कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या(उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.