नवी दिल्ली : (Ind Vs Pak World Cup 2023) या वर्षी ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेतील सर्वात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak 2023) हा हायव्होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळेच आकर्षण असते. सामनाही तेवढात अटीतटीचा आणि रोमांचक होतो. त्यात सामना विश्वचकातील असल्यास उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचते.
त्यासाठी क्रिकेटप्रेमींनी तीन महिने आधीपासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या सामन्याच्या पार्श्वभूमीवर विमान भाडेही वाढले आहेत. 14 ऑस्टोबरला म्हणजे सामन्याच्या एक दिवस आधी, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील विमान तिकिटांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सामन्याच्या काही दिवस आधी महत्त्वाच्या शहरांमधून अहमदाबादला येणाऱ्या विमान प्रवासाची जवळपास 35% पेक्षा जास्त भाव वाढ झाली आहे. क्रिकेटप्रेमी, VVIP आणि प्रायोजक आतापासूनच विमान, हाॅटेल आणि सामन्याचे टिकीट बुक करत आहेत.
चेन्नई ते अहमदाबाद प्रवासासाठी आता १५ जुलै रोजी तीन महिने अगोदर बुक केलेले असतानाही नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी प्रति व्यक्ती ४५,४२५ रुपये आश्चर्यकारकपणे मोजावे लागतील. सामान्य परिस्थितीत, या प्रवासासाठी साधारणतः १०,००० रुपये खर्च येतो. सामन्यांच्या दिवसात जास्त मागणी असण्याच्या अपेक्षेने, आगाऊ बुकींग केलेले असतानाही, १४-१६ ऑक्टोबरसाठी प्रमुख शहरांमधून अहमदाबादला जाणारे विमान भाडे गगनाला भिडले आहे. मुंबई आणि दिल्ली सारख्या जवळपासच्या गंतव्यस्थानांवर देखील या तारखांसाठी अनुक्रमे ३३९% आणि २०३ टक्क्याने भाडे वाढले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची अधिकृतपणे घोषित केल्यापासून एका रात्रीसाठी हॉटेलचे दर ५ पटीने वाढले आहेत. लक्झरी हॉटेल्स प्रति रात्र ५०,००० पर्यंत आकारत आहेत आणि हे फक्त हॉटेल्सच नाही तर फ्लाइट तिकीटही वाढत आहेत. लोकांनी तीन महिने अगोदर बुकिंग केले तरी विमान भाडे सामान्यपेक्षा सहा पटीने महाग असते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील इकॉनॉमी क्लाससाठी दिल्ली-अहमदाबाद तिकिटाची किंमत सुमारे ३००० असेल. पण त्याच तिकिटाची किंमत सामन्याच्या एक दिवस आधी २०,००० रुपये असेल.”
विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण अनेक प्रसंगी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक स्पर्धा पाहायला मिळाल्या आहेत.