भारत-पाकिस्तान सामन्याच्या काळात अहमदाबादपर्यंतच्या फ्लाइट आणि तिथला हॉटेल स्टे यांना मागणी वाढल्याने दरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते.
ऑक्टोबर २०२३ मध्ये होत असलेल्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेतील सर्वात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळेच आकर्षण असते. सामनाही तेवढाच अटीतटीचा आणि रोमांचक होतो. त्यात सामना विश्वचषकातील असल्यामुळे उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.
फ्लाइट्स दरांत सात पटींपर्यंत वाढ
यंदा १४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान फ्लाइट्सने अहमदाबादला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही पटीत अधिक पैसे खर्च करावे लागतील अशी शक्यता आहे. काही शहरांची उदाहरणे पाहिली तर मुंबई ते अहमदाबाद जाणाऱ्या फ्लाईट्सचे तिकीट २२ हजार रुपये इतके वाढल्याचे दिसून आले. दिल्लीवरून अहमदाबादला जायचे असेल तर तिकिटाची किंमत २१ हजार रुपये इतकी दिसून आली. साधारण काळात ही किंमत ३००० असते. १४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान कोलकाता ते अहमदाबादसाठी फ्लाइट्स तिकिट ४२ हजार रुपये इतके झालेय. तर बंगळुरूहून जायचे असल्यास फ्लाइट्स तिकीट १८ हजार रुपये इतके दिसून आले. भारत आणि पाकिस्तान सामन्यामुळे फ्लाइट्सच्या तिकिटांमध्ये ही मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती प्राप्त झाली.
१५ ऑक्टोबरला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्ये लढत होते. कारण टू सायडेड सामन्यांचे आयोजन कित्येक वर्षांपासून बंद आहे.
हॉटेल दरातही मोठी वाढ
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआय) यांनी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले, त्या क्षणापासून अहमदाबादमधील हॉटेल रूमसाठी मागणी वाढली असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे हॉटेल रूम बुक होत असून. भारत-पाकिस्तान सामन्याची अधिकृतपणे घोषित केल्यापासून हॉटेलचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एका रात्रीसाठी हॉटेलचे दर अगदी पाच पटीपर्यंत वाढले आहेत.