मोठी बातमी! ‘भारत २०३५ पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार’

भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक

भारत २०३५ पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार असून २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरवेल, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी केली.

अंतराळ क्षेत्रात भारत एकापाठोपाठ एक नवीन कामगिरी करत आहे. आता केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विज्ञान मंत्रालयाच्या कामगिरीवर दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सिंह यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ उपक्रमांवर प्रकाश टाकला. “२०३५ पर्यंत आमचे स्वतःचे अंतराळ स्थानक असणार आहे. अमेरिका आणि एक किंवा दोन इतर देशांनंतर भारताचे अंतरीक्ष स्थानक म्हणून ओळखले जाईल. २०४० पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर एक भारतीय उतरेल,” असे त्यांनी सांगितले.

भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयान मिशन याबद्दल बोलताना सिंग यांनी २०२४ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, भारताने खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून ६ हजार मीटर पर्यंत खोली शोधून समुद्रतळावर मानव पाठवण्याची योजना आखली असल्याचे सांगितले.

Rashtra Sanchar: