नागपूर : (India Vs Australia Test Series 1st Match 2nd Day) रोहित शर्मा जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा भारतीय संघ फ्रंटफूटवर असयाचे पाहायला मिळते. हीच गोष्ट नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावातही पाहायला मिळाली. भारताचे फलंदाज जिथे मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरत होते तिथे रोहितने दमदार शतक झळकावले आणि भारताला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. रोहितच्या या विक्रमी शतकामुळे भारताने पहिल्या डावातील धावसंख्येचा चांगलाच पाया रचला. रोहितने रचलेल्या या पायावर रवींद्र जडेजाने कळस उभारल्याचे पाहायला मिळाले. रोहितचे शतक आणि जडेजा व अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत १४४ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताची ७ बाद ३२१ अशी अवस्था आहे. रोहित शर्माने यावेळी १२० धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने ६६ आणि अक्षर पटेलने ५२ धावांची खेळी साकारली.
दुसऱ्या दिवसाची चांगली सुरुवात रोहित आणि अश्विन यांनी केली. रोहितबरोबर खेळताना अश्विनही चांगलाच आक्रमक झाला होता. अश्विनने यावेळी नाइट वॉचमन म्हणून खेळायचा येत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २३ धावांची खेळी साकारली. पण अश्विन बाद झाला आणि त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजारा यावेळी सात, विराट कोहली १२ आणि सूर्यकुमार यादव ८ धावांवर बाद झाले. भारताची ५ बाद १६८ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर रोहितने संघाला सावरले. रोहितने यानंतर विक्रमी अर्धशतक झळकावले आणि संघाला पहिल्या डावाची आघाडीही मिळवून दिली. रोहितने यावेळी १५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १२० धावांची सर्वाधिक खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर भारतीय संघाचे काय होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. पण या प्रश्नाचे उत्तर रवींद्र जडेजाने दिले. जडेजाने यावेळी अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. जडेजाला यावेळी अक्षर पटेलची चांगलील साथ मिळाली आणि या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारताचाच वरचष्मा या कसोटीवर पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला १७७ धावांत गुंडाळले होते आणि १ बाद ७७ अशी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघ कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण भारताने दुसऱ्या दिवशी जास्त निराश केले नाही. खासकरून रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या धावसंख्येला चांगला आकार दिला.