मेलबर्न : (India Vs England T-20 World Cup Match Updates) भारतीय संघाला विश्वचषकातील सेमीफायनल इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापुर्वी मंगळवारी सकाळी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळं सेमी फायनलमध्ये रोहित शर्मा खेळणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शर्माने आर्म पूल करण्याचा प्रयत्न केला आणि १५० पेक्षा अधिक वेगाने फेकला जाणार थ्रो डाउन चेंडू त्याला लागला. एका सेकंदाने रोहित शॉट मारण्यास चुकला आणि चेंडू त्याच्या हाताला लागला. चेंडू लागल्या क्षणी रोहितने सराव सोडला आणि तो हाताला आइस पॅक लावताना दिसला. रोहित शर्माला चेंडू लागल्यानंतर तो वेदनेने विव्हळत असल्याचं व्हिडिओत दिसत होते. तसंच, रोहित नेटच्या जवळ बसला होता आणि लांबून दुसऱ्या खेळाडूंचा सराव पाहत होता. रोहितला दुखापत झाल्याची बातमी समोर येताच भारतीय प्रेक्षकांची चिंता वाढली होती.
मात्र, आता रोहित शर्माची दुखापत गंभीर नसल्याचं कळतं आहे. हाताला चेंडू लागल्यानंतर रोहित शर्माने काहीवेळासाठी ब्रेक घेतला होता. ब्रेक घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा तो नेट प्रॅक्टिक्स करताना दिसला. रोहितला पुन्हा फलंदाजी करताना पाहून प्रेक्षकांनाही आनंद झाला आहे. रोहितला पुन्हा मैदानात पाहून आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता प्रेक्षकांना भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे वेध लागले आहेत.