हैदराबाद : (India Vs New Zealand ODI Series 2 Match 2023) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीकरत ३४९ धावा केल्या होत्या. सामन्यात भारताने न्यूझीलंडची अवस्था ६ बाद १३१ केली होती. पण त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार कमबॅक करत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. या लढतीनंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
पहिल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने भारतीय संघाला दंड केला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी मॅच फीच्या ६० टक्के इतका दंड केला आहे. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ ही कारवाई केली असून भारताने निश्चित वेळेत ३ ओव्हर कमी टाकल्या होत्या. भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आयसीसीच्या आचार संहितेच्या २.२२ नुसार दंड करण्यात आला आहे. प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूच्या मॅच फीमधून २० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. सामना झाल्यानंतर या बाबतची सुनावणी झाली.
या सुनावणीत कर्णधार रोहित शर्मा, अंपायर अनिल चौधरी, नितिन मेमन आणि तिसरे अंपायर केएन अनंतपद्मनाभन, चौथे अंपायर जयरामन मदनगोपाल उपस्थित होते. या सुनावणीत रोहित शर्माने चूक मान्य केली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या लढतीत भारताकडून ही चूक झाली. आता दुसऱ्या लढती पुन्हा अशीच चूक झाल्यास कर्णधार रोहित शर्मावर एका सामन्याची बंदी येऊ शकेत. दोन्ही संघातील दुसरी सामना उद्या २१ जानेवारी रोजी रायपूर येथे होणार आहे. ही सामना जिंकल्यास भारत मालिका देखील जिंकू शकतो.