(India vs Pakistan Women’s T20 World Cup) : आयसीसीच्या विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताचा आज पाकिस्तानशी मुकाबला होत आहे. एरवी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर नेहमीच वर्चस्व राखणाऱ्या भारताने या अगोदरच्या आशिया कप स्पर्धेतील पाकविरुद्धची लढत गमावली होती. मात्र, आज क्षणोक्षणी सावधता बागळून पाकला संधी न देण्यावर भारतीयांचा भर असेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी १९ वर्षांखालील महिलांचे टी-२० विश्वकरंडक विजेतेपद मिळवल्यामुळे महिला संघाचे मनोबल वाढलेले असणार. त्यात विजेतेपद मिळवून देणाऱ्या शेफाली वर्मावर अधिक जबाबदारी असेल. तर स्मृती मानधनासह कर्णधार हरमनप्रीत कौरही दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आज सामन्यापूर्वीच अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. हरमनप्रीत खेळू शकली नाही तर नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता असेल. शेफाली वर्माला पसंती दिली जाऊ शकते.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धामध्ये भारतीय महिला संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत धडक मारत आहे, परंतु इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचे अडथळे पार करता आलेले नाही. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर खेळू शकली नाही तर मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज जेमिमी रॉड्रिग्जवर अधिक जबाबदारी असेल, परंतु गेल्या काही सामन्यात त्याला आपल्या गुणवत्तेला न्याय देता आलेला नाही.