भारताची दमदार सुरवात! रोहित-यशस्वी-विराटची धडाकेबाज अर्धशतके, पहिल्या दिवसात 288 धावा..

India vs West Indies 2nd Test : रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 288 धावा केल्या आहेत. विराट कोहली 87 आणि रविंद्र जाडेजा 36 धावांवर नाबाद खेळत आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार अर्धशतके झळकावत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

भारताचा मध्यक्रमाच्या दोन विकेट्स लवकर गेल्या. पण विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. जाडेजा ८४ चेंडूवर चार चौकारासरह ३६ धावांवर नाबाद आहे. तर १६१ चेंडूत विराट कोहली ८७ धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत आठ चौकार लगावले. विराट कोहलीने आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार फलंदाजी केली.

यजमान वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी वनडे स्टाईल सुरुवात केली.पहिल्या कसोटी सामन्यात द्वितकी भागिदारी करणारे रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही या जोडीने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 139 धावांची भागिदारी केली. त्यामुळे भारताचा डाव मजबुत करण्यात दोन्ही फलंदाजांना यश आलं आहे.

रोहित शर्माने 80 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने दोन षटकार आणि 9 चौकार लगावले. रोहित शर्मा याचं शतक अवघ्या २० धावांनी हुकले. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले होते, दुसऱ्या कसोटी सामन्यात 80 धावांची खेळी केली. त्यामुळे हिटमॅन शर्मा पुन्हा एकदा ‘फाॅर्म’मध्ये आल्याचे दिसून आला आहे.

Prakash Harale: