नवी दिल्ली : तरुणांचा देश म्हणून ओळख असलेला, भारत देश येत्या ३० वर्षात म्हातारा होणार असल्याचे विश्लेषण अतुल ठाकूर यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’साठी यूएन वर्ड पाॅप्युलेशन प्राॅस्पेक्टसमध्ये केले आहे. या दशकाच्या शेवटी जगातील बहुतेक देशांचा लोकसंख्या वाढीचा वेग कमी होणार असून, प्रजनन पातळी देखील कमी होणार आहे.
दरम्यान, भारत हा तरुणांचा देश आहे. एकूण लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या ४० पेक्षा कमी वयाची आहे. देशात २०२० मध्ये १० ते १४ वयोगटातील मुलांची सर्वाधिक संख्या होती. मात्र, २०५० पर्यंत भारतातील लोकसंख्या वृद्ध होऊ लागेल. लोकसंख्येमध्ये ४० वर्षांवरील लोकांची संख्या सर्वाधिक असेल. तोपर्यंत ४० ते ४४ वयोगट भारतात सर्वाधिक असेल. चालू शतकाच्या अखेरीस भारताची एकूण लोकसंख्या आजच्या तुलनेत सुमारे एक तृतीयांश कमी होईल.
या शतकाच्या अखेरीस देशाची लोकसंख्या ३४ टक्के कमी होईल असा अंदाज काढला जात आहे. तर पाकिस्तान, टांझानिया, नायजेरिया सोबत अनेक देशांची लोकसंख्या वाढेल. भारताबद्दल बोलायचे झाले तर २१०० पर्यंत देशाची लोकसंख्या ३४ टक्क्यांनी कमी होईल. UNच्या मते, २०२० मध्ये भारताची लोकसंख्या १३८ कोटी होती.