नवी दिल्ली | Veda Krishnamurthy Marriage – भारतीय संघाच्या स्टार महिला क्रिकेटपटूनं (Indian Cricketer) गुपचूप लग्न उरकलं आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) लग्नबंधनात अडकली आहे. वेदा कृष्णमूर्तीनं कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसालासोबत (Arjun Hoysala) लग्न केलं आहे. वेदानं ही खूशखबर सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे तिच्यावर तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष सांगायचं झालं तर वेदानं तिच्या दिवंगत आईच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्जुनसोबत लग्नगाठ बांधली आहे. 2021 मध्ये वेदाच्या आई चेलुवांबा देवी यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिची बहीण वत्सला शिवकुमारचंही कोरोनामुळे निधन झालं.
वेदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “आई हे तुझ्यासाठी आहे. तुझा वाढदिवस नेहमीच खास असेल.” तसंच वेदानं तिच्या दिवंगत बहिणीसाठी म्हटलं आहे की, “लव्ह यू अक्का”.
वेदा आणि अर्जुन यांनी बेंगळुरू येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीनं कोर्ट मॅरेज केलं आहे. यावेळी कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थितीत होते. तसंच ते दोघंही अत्यंत साध्या कपड्यांमध्ये दिसले.