सिलहट : (Indian women’s cricket team wins the Asia Cup-2022) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जे भारताच्या पुरुष संघाला जमले नाही ते हमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने करून दाखवले. महिलांच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला ८ विकेटनी पराभवाची धूळ चारत, भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. या विजयामुळे भारतीय संघाची आशिया चषकातील सप्तपदी देखील पूर्ण झाली आहे.
भारतीय महिला संघ सध्या फॅार्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आशिया कप जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. आतापर्यंत ८ वेळा ही स्पर्धा झाली आहे. २००४ साली भारताने प्रथम विजेतेपद मिळवले होते. तेव्हापासून २०१६ पर्यंत सलग सहा विजेतेपद टीम इंडियाने मिळवली होती. २०१८ मध्ये अंतिम सामन्यात भारताचा बांगलादेशने पराभव केला होता. त्याच पराभवाचा वचपा काढत आणि श्रीलंकेला धूळ चारत सातव्यांदा आपले नाव आशिया कप स्पर्धेत कोरलं आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं भारतीय गोलंदाज रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड, आणि स्नेह राणाच्या, भेदक माऱ्यासमोर गुडघे टेकले. श्रीलंकेनं 20 षटकात 9 विकेट्स गमावून भारतानंसमोर आवघ्या 66 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना 8.3 षटकातच जिंकला.
श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनासोबत सलामीला आलेली शेफाली वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. स्मृती मानधानानं दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी सुरूच ठेवली. तिनं या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत नाबाद अर्धशतकीय खेळी केली. तर, कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 11 धावांची खेळी केली. भारतानं हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रनावीरा आणि कविशा दिल्हारी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.