चीनच्या ताज्या कुरापती

शेजारच्या देशात चाललंय काय?

दत्तात्रय शेकटकर, ले. ज. (निवृत्त)

भूतानच्या सीमेच्या दहा किलोमीटर आत घुसखोरी करून हा रोड उभारला आहे. चीन अमो चू खोर्‍यात गावे आणि रस्तेबांधणीची कामे करीत आहे. विशेष म्हणजे भूतानच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे. पंगडा गाव आणि या गावासाठी आवश्यक असलेल्या सेवासुविधा पुरवण्याच्या नावाखाली सीमेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याची चिनी रणनीती आहे.

चीनचं विस्तारवादी धोरण लपून राहिलेलं नाही. भारताच्या सीमांवर अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणं, शेजारच्या देशात गावं उभारणं आणि आता तर भूतान या भारताच्या मित्रदेशाच्या सीमेवर गाव उभारणं यातून चीनचा भारताला शह देण्याचा प्रयत्न दिसतो. भूतानमध्ये वसवलेल्या गावाच्या आडून सुरू असलेल्या चीनच्या कुरापतीमुळे भारताची चिंता वाढली आहे. ही गंभीर चाल लक्षात घेऊन भारताला पावलं उचलावी लागणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी भारत आणि चीनदरम्यान डोकलाम परिसरावरून तणाव निर्माण झाला होता. ७२ दिवस चाललेल्या या संघर्षात भारताने विजय मिळवला. चीनने तात्पुरती माघार घेतली; परंतु त्यानंतरच्या दोनच वर्षांमध्ये चीनने डोकलाम परिसरात एक गाव वसवण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी त्या गावाचं संकल्पचित्र, नकाशे समोर आले. त्याच वेळी अरुणाचल प्रदेशातही चीनने भारताच्या हद्दीत घुसून गाव वसवायला सुरुवात केली होती. डोकलाम भागातल्या गावाचं काम आता पूर्ण झालं आहे.

विस्तारवादाच्या विकृतीनं पछाडलेल्या चीनने भारत आणि भूतानच्या सीमेवरील कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. इथल्या अमो चू खोर्‍यात संपूर्ण पूल, इमारतीसह चीनने गाव वसवलं आहे. या गावाला पंगडा असं नाव दिलं असून गावाच्या माध्यमातून सीमेवर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. भारताच्या संरक्षण खात्याच्या उपग्रहांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये चीन भूतान सीमेला लागून असलेल्या भागात गाव वसवत असल्याची छायाचित्रं प्रसिद्ध केली होती. आता हे गाव पूर्णपणे वसवलं गेलं असून ग्रामस्थांच्या घरासमोर गाड्या उभ्या असल्याची नवी छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. चीनने भूतानच्या जमिनीवर कब्जा करून पंगडाजवळच एक ‘ऑल वेदर रोड’ बांधला आहे. भूतानच्या सीमेच्या दहा किलोमीटर आत घुसखोरी करून हा रोड उभारला आहे. चीन अमो चू खोर्‍यात गावं आणि रस्तेबांधणीची कामं करत आहे. विशेष म्हणजे भूतानच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे. पंगडा गाव आणि या गावासाठी आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा पुरवण्याच्या नावाखाली सीमेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याची चिनी रणनीती आहे.

भूतान आणि भारताच्या सीमेत सहज घुसखोरी करण्यासाठी डोकलाम पठार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताचं ‘चिकन नेक’ समजल्या जाणार्‍या ‘सिलिगुडी कॉरिडॉर’वर हल्ला करून देशाला ईशान्य भारतापासून वेगळं करण्यासाठी चीनला डोकलाम पठार हवं आहे. हाच ‘सिलिगुडी कॉरिडॉर’ ईशान्येकडील सर्व राज्यांना भारताशी जोडतो. चीन आणि भारतामध्ये २०१७ मध्ये झालेल्या डोकलाममधल्या धुमश्चक्रीत भारतीय जवानांनी बलिदान देत चिनी सैन्याला डोकलाममध्ये पाय ठेवण्यापासून रोखलं होतं. गलवानच्या लष्करी संघर्षानंतर चीन मूकपणे भारताचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाकडे लागलं आहे आणि चीन आता शांत बसला आहे, असा विचार आपणही करू लागलो आहोत; पण सत्य हे आहे की चीन सतत भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असतो. भारताला वेढा घालण्यासाठी त्यांनी भूतानकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा विस्तार सुरू केला आहे. हा रस्ता वेगाने वाहणार्‍या अमो चू नदीच्या काठावर आहे.

चीनची जमिनीची भूक सतत वाढत आहे आणि आज भारताला काळजी करण्याची गरज आहे. कारण चीन हे गाव वसवण्याचा प्रयत्न करीत असलेला भूतानचा भाग चीनच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. चीनने गेल्या वर्षी या भागावर कब्जा केला होता.

Sumitra nalawade: