भारताचा नीरज चोप्रा मैदानावर उतरण्यास सज्ज…

भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. फिनलंडमध्ये होणार्‍या पावो नूरमी गेम्स २०२२ या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असेल.

नवी दिल्ली : पावो नूरमी गेम्स ही स्पर्धा जागतिक अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील दुसरी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे. डायमंड लीगनंतर पावो नूरमी गेम्सचा क्रमांक लागतो.

नीरज चोप्राव्यतिरिक्त, ग्रेनेडाचा विद्यमान जगज्जेता अँडरसन पीटर्स, टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदकविजेता चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज आणि लंडन २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉल्कोट हे पुरुषांच्या १०-अ‍ॅथलिट भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चोप्राचा कट्टर प्रतिस्पर्धी व जर्मन खेळाडू जोहान्स वेटरदेखील तुर्कू येथील स्पर्धेत सहभागी होणार होता. परंतु, त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचे देशबांधव ज्युलियन वेबर आणि अँड्रियास हॉफमन मात्र या ठिकाणी येणार आहेत.

टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा जवळपास १० महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरणार आहे. मैदानात आल्यानंतर त्याला जगातील दिग्गज भालाफेकपटूंचा सामना करावा लागणार आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेमध्ये पीटर्स आणि वडलेच या दोघांनीही ९० मीटरचा टप्पा पार केलेला आहे. पीटर्सने दोहा येथे ९३.०७ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. या हंगामातील हा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.

नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे. पुढील महिन्यात होणार्‍या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत येण्याचा प्रयत्न करेल.

Prakash Harale: