भारताच्या वैष्णवीला पराभवाचा धक्का

आशियाई कुमार टेनिस स्पर्धा : आॅस्ट्रेलियाच्या लिली टेलरकडून पराभूत

पुणे : सहाव्या मानांकित आॅस्ट्रेलियाच्या लिली टेलरने चौथ्या मानांकित भारताच्या वैष्णवी आडकरचा पराभव करून एमएसएलटीए बी १ आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत खळबळ उडवून दिली. दुसरीकडे भारताच्या मानस धामणे, युवान नांदल, आर्यन शाह, अमन दहिया यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पाचव्या मानांकित मानस धामणेने जपानच्या तकमासा मिशिरो यांचा ६-२, ६-४, तर तिसऱ्या मानांकित युवान नांदलने जपानच्या आठव्या मानांकित रिया हत्तोरीचा ६-२, ७-५ गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली.

सहाव्या मानांकित आर्यन शाहने कोरियाच्या चौथ्या मानांकित वूह्युक चांग याला पराभवाचा धक्का देत ६-४, ६-४ असा विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित अमन दहिया याने थायलंडच्या सुफावत साओई याचा ६-१, ६-४ असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एकेरीत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित भारताच्या दुसऱ्या मानांकित श्रुती अहलावतने कझाकिस्तानच्या असिल्झान आरिस्टनबेकोवा हिचा ६-१, ६-० गुणांनी नमवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. तैपेईच्या अव्वल मानांकित यू-युन ली हिने भारताच्या सोनल पाटीलचा ६-२, ६-२ असा, तर लिली टेलरने भारताच्या चौथ्या मानांकित वैष्णवी आडकरचा ७-५, ३-६, ६-४ असा पराभव केला.

आॅस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित इमर्सन जोन्सने भारताच्या पाचव्या मानांकित सुहिता मारुरीचा ६-३, ६-२ असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित जोड रुशील खोसला व युवान नंदल यांनी भारताच्याच आर्यन लक्ष्मणन व रेथिन प्रणव सेंथिल कुमार यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात भारताच्या अस्मी अाडकर व वैष्णवी अाडकर या जोडीने व्लादिस्लावा अँड्रीव्स्काया व सुहिता मारुरी यांचा ६-०, ६-४
गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत
प्रवेश केला.

स्पर्धेचे काही निकाल (मुख्य ड्रॉ : एकेरी (उपांत्यपूर्व फेरी) :
मुले : मानस धामणे (भारत) (५) वि. वि. तकमासा मिशिरो (जपान) ६-२, ६-४; युवान नांदल (भारत) (३) वि. वि. रिया हत्तोरी (जपान) (८) ६-२, ७-५; आर्यन शाह (भारत) (६) वि. वि. वूह्युक चांग (कोरिया) (४) ६-४, ६-४; अमन दहिया (भारत) (२) वि. वि. सुफावत साओई (थायलंड) ६-१, ६-४;

मुली : लिली टेलर (आॅस्ट्रेलिया) (६) वि. वि. वैष्णवी आडकर (भारत) (४) ७-५, ३-६, ६-४; यू-युन ली (तैपेई) (१) वि. वि. सोनल पाटील (भारत) ६-२, ६-२; इमर्सन जोन्स (आॅस्ट्रेलिया) (३) वि. वि. सुहिता मारुरी (भारत) (५) ६-३, ६-२; श्रुती अहलावत (भारत) (२) वि. वि. असिल्झान आरिस्टनबेकोवा (कझाकिस्तान) ६-१, ६-०.

Prakash Harale: