मुंबई: काल (सोमवार) विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेच्या 12 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरातला गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला दिसत आहे. या भुकंपानंतर चंद्रकांत पाटील यांनी काही नेत्यांसह आज पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘समजने वाले को इशारा काफी है’, असं सूचक विधान केलं आहे. सध्या आम्ही ‘वेट अॅण्ड वॉच’ या भूमिकेत असल्याचंही ते म्हणाले.
राज्यसभेत भाजपने तीन तर विधान परिषदेत 5 उमेदवारांच्या विजयानंतर आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान एकनाथ शिंदेंच्या ट्विटबाबत चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी समजने वाले को इशारा काफी है, असा सूचक इशारा त्यांनी दिला. तसंच सध्या आम्ही वेट अँड वॉच या भूमिकेत असल्याचंही ते म्हणाले.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्यांनी भाजपला मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार, त्यांच्या मदतीमुळेच यश शक्य झालं. महाविकास आघाडीच्या नाराज आमदारांनी विधान परिषदेत भाजपला मतदान केलं. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची हुशारी सिद्ध झाली. त्यांचंही महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्यावतीने देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन.
विश्वासघात करून हे सरकार स्थापन झालं. त्यानंतर पहिल्या महिन्यातच आमदारांनी याला विरोध केला होता. भाजपला धडा शिकवण्यासाठी बाहेर पडल्याचं सांगून आमदारांची समजूत काढण्यात आली. याचा परिणाम आज घडल्या त्या घटनांमधून दिसून येतो. पहिल्या दिवसापासून अनेक आमदारांच्या मनात ही खदखद होती. ती आता दिसत आहे, असंही ते म्हणाले.