जळगाव | Indurikar Maharaj’s Statement Under Discussion – प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जळगाव शहरातील पिंपळा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्ताने किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी इंदुरीकर महाराज उपस्थित होते. यावेळी शासकीय कार्यपद्धती, अधिकारी व त्यांची वेतनश्रेणी यावरुन इंदुरीकर महाराज यांनी लक्ष वेधलं आहे. ते म्हणाले की, “जे काम करत नाहीत त्यांचा पगार जास्त आणि जे काम करतात त्यांचा पगार कमी आहे. विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार पगार ठरवला पाहिजे,” असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे.
तसंच यावेळी इंदुरीकर महाराजांनी मोबईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मुलांच्या नुकसानावरही पाल्य आणि पालकांना झापलं आहे. ते म्हणाले, “आजच्या महाविद्यालयीन तरुणांबरोबरच शाळकरी विद्यार्थीही मोबाईल व्यसनाच्या आहारी गेले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांकडून फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमांचा सारखा वापर केला जात आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संस्कारावर पडला असून त्यातून विपरीत घटना घडत आहे.”
त्याचबरोबर अल्पवयीन मुलीस पळून जात असल्याचं उदाहरण देत इंदुरीकर महाराजांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसंच पुढे बोलताना तरुण पिढी दारुच्या इतकी आहारी गेली आहे की त्यामुळे दारुचा खप वाढला आहे. भविष्यात या मुलांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत, असंही इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे.