नवी दिल्ली : भारताने मोठ्या प्रमाणात पाम तेलाची आयात केली तर हे पाऊल भारताच्या अडचणीत वाढ करणार ठरणार आहे. कारण, इंडोनेशियाने २८ एप्रिलपासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या भारतीयांचे कंबरडे मोडणार आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाने देशात आधीच महाग असलेले खाद्यतेल आणखी महाग होणार आहे. या आधीही इंडोनेशियाने जानेवारीमध्ये पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. तर मलेशिया दुसऱ्या क्रमांकावर येतो. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाने भारतातील पाम तेलाच्या आयातीवर वाईट परिणाम होणार आहे. भारताला आता मलेशियावर अवलंबित्व वाढवावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत सरकार पाम तेल उत्पादनावर सतत भर देत आहे. राष्ट्रीय खाद्यतेलाच्या मोहिमे अंतर्गत २०२५-२६ पर्यंत भारतात पाम तेलाचे उत्पादन तिप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.