‘भारतीय शिक्षणव्यवस्थेतील मूल्यांचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन
पुणे : भारतीय शिक्षण आणि समाजव्यवस्थेत मूल्यविरोधी संकल्पनांची पेरणी करण्याचे काम युरोप, अमेरिकेने सातत्याने केले. इंग्रजांच्या वसाहतवादामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली. भारतीय मूल्यव्यवस्थेचे झालेले हे नुकसान स्मरणात ठेवून राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार्या शिक्षण क्षेत्राने भारतीय समाजव्यवस्थेची मूल्ये रुजवावी, असा सल्ला इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशनचे संस्थापक स्वामिनाथन गुरुमूर्ती यांनी दिला.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थांचे संस्थापक आणि शिक्षण क्षेत्रात विविध पातळ्यांवर योगदान देणार्यांना भारतीय शिक्षणव्यवस्थेतील मूल्यांचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन करताना गुरुमूर्ती बोलत होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशनचे पुणे महानगराध्यक्ष अशोक गुंदेचा, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गुणवंत कोठारी, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे पुणे महानगर महामंत्री किशोर येनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वामिनाथन गुरुमूर्ती म्हणाले की, आपली भारतीय समाजव्यवस्था ही नीतिमूल्यांवर, तर युरोप-अमेरिकेतील समाजव्यवस्था ही कायदा आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आधारित आहे. एकत्र कुटुंबपद्धती हा आपल्या समाजव्यवस्थेचा आत्मा होता. मात्र, मल्टिनॅशनल कंपन्यांनी त्यांच्या हितासाठी विभक्त कुटुंबपद्धतीचे चित्र आपल्या मनावर ठसवले आणि दुर्दैवाने आपण त्यांच्या जाळ्यात अडकलो. समाजाच्या मूल्यव्यवस्थेला आपण कायमच महत्त्व देत आलो आहोत.
परदेशातील आई-वडील विशिष्ट वयानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीदेखील जबाबदारी घेत नाहीत आणि भविष्यात हीच मुले आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सरकारवर टाकतात. भारतीय समाजव्यवस्थेतील कुटुंबसंस्थेच्या हक्कापेक्षा कर्तव्यांना अधिक महत्त्व दिले जाते. ही कर्तव्ये मूल्यव्यवस्थेचेच प्रतीक आहेत. मात्र शिक्षणाच्या माध्यमातून भौतिक मूल्यवादाची जी रुजवण केली जात आहे, ती धोकादायक आहे. भारतीय तरुणांकडे क्षमता आहे, ऊर्जा आहे आणि झोकून देऊन काम करण्याची तयारीदेखील आहे.
मात्र, भारतीय शिक्षणव्यवस्था आजही मॅक्स वेबरच्या विचार पद्धतीवर आधारलेली आहे. हिंदू आणि बौद्ध समाजात उद्योजक निर्माण होणार नाहीत, असे भाकीत मॅक्स वेबरने केले होते. याचे कारण हे दोन्ही समाज धर्माच्या अधिपत्याखाली असल्याचे म्हटले होते. भारत विकास करण्यास अपात्र आहे, असे म्हणणार्या मॅक्स वेबरला आपल्या देशातील तरुणांनी त्यांच्या संशोधनाच्या, उद्योग विकासाच्या आणि कौशल्याधारित नवउद्योगाच्या माध्यमातून आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत. देशातील शिक्षणव्यवस्थेला मूल्याधिष्ठित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्या प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. यावेळी गुणवंत कोठारी म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात देशाला जगामध्ये अव्वल स्थान निर्माण करायचे असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्थानिक भाषेत प्राथमिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. भारतीय जीवनमूल्य केंद्रस्थानी ठेवून शिक्षणविषयक धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे असलेले अद्वैताचे स्थान शिक्षणव्यवस्थेत प्रत्यक्षात आणले पाहिजे.