पंढरपूर : (Pandharpur) उमेश परिचारक (Umesh Paricharak) यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या युटोपियन शुगरवरती (Utopian Sugars) दिवाळखोरीची कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या आज प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. परंतु प्रत्यक्षात साडेतीनशे कोटी रुपयांची एकूण मालमत्ता असलेल्या या कारखान्यावर केवळ ८० कोटींचे कर्ज असताना दिवाळखोरीची कारवाई कशी? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ‘पंढरी संचार’च्या (Pandhari Sanchar) सूत्रांनी केला. त्यातून ही बँकेची एक तांत्रिक प्रक्रिया असल्याचे समजले असून या दिवाळखोरीच्या प्रक्रियेलादेखील न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची माहिती हाती आली आहे.
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते व सर्वसामान्य शेतकर्यांचे कैवारी, आजारी सहकारी साखर कारखान्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे कै. सुधाकरपंत परिचारक (Sudhakarpant Paricharak) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे काढलेल्या युटोपियन साखर कारखाना या खाजगी कारखान्याचे सर्वेसर्वा म्हणून उमेश परिचारक हे कारभार पहात असतानाच काही दिवसांपूर्वीच युटोपियनच्या कार्यकारी संचालक पदावर रोहन परिचारक यांची नियुक्ती करण्यात आली. युटोपियन सहकारी साखर करखाना हा शेतकर्यांचा ऊस नेण्यापासून एफआरपी तसेच भाव देण्यापर्यंत सर्व प्रक्रियांवर जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना मागे टाकत असतानाच अचानकपणे १८ डिसेंबर रोजी वृत्तपत्रात या कारखान्याने घेतलेल्या कर्जाबाबत दिवाळखोरीची नोटीस प्रसिद्ध केल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात विविध प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे.
वास्तविक पाहता या खाजगी साखर कारखान्याने अतिशय उत्तम रितीने प्रगती सुरू केली असतानाच दिवाळखोरीची चर्चा होत असल्यामुळे विशेषत: परिचारक विरोधकांमध्ये गुदगुल्या सर्वांनाच होऊ लागलेल्या दिसतात. या कारखान्याच्या संदर्भातील एका अधिकृत सूत्रानुसार हे घेतलेले कर्ज रूटीनप्रमाणे असून या कर्जाची पुर्नबांधणी करा अशी मागणी बँकेकडे करण्यात आली होती पण बँकेकडून ती फेटाळण्यात आली. वास्तविक पाहता कर्ज घेण्यासाठी जे तारण देण्यात येत असते त्या तारणाची साखर कारखान्याची मालमत्ता (जमीन, मशिनरी वगैरे) सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची असल्याची सांगण्यात येते तर बँकेचे कर्ज सुमारे ८० कोटी रुपये आहे. या संदर्भात युटोपियन कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात या दिवाळखोरी प्रक्रियेच्या संदर्भात स्टे मागितला होता. तो स्टे ही न्यायालयाने दिला असल्याचे या सूत्राकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या साखर उद्योगात कै. सुधाकरपंत परिचारक यांचे नाव आजारी कारखान्यांचे डॉक्टर म्हणून घेतले जाते. त्यांच्या कुटुंबियांकडून सहकारी तत्त्वावर चालवण्यात येत असलेला श्री पांडूरंग सहकारी साखर कारखाना हा सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी पार पाडत असताना आणि सभासदांच्या अडचणींना धावत जाणारा म्हणून पांडूरंगची ओळख जिल्ह्यात होत असतानाच परिचारक कुटुंबियांकडून चालविल्या जाणार्या युटोपियन कारखान्यावर हे कारखाना दिवाळखोरीचे संकट उभारले असल्याने याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याचेही संबंधितांकडून सांगण्यात आले असूनसुद्धा केवळ परिचारकांना उघडे पाडण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात असल्याची चर्चा पांडूरंग परिवारातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. एखाद्या बँकेच्या प्रकरणाप्रमाणेच हे या कारखान्याच्या कर्जाचे प्रकरण आहे. त्यामुळे काही विशेष चिंता करण्याचे कारण नाही, असेही या कारखान्याच्या एका जबाबदार सूत्राकडून सांगण्यात आले. पण दिवाळखोरीच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले असून त्यामुळे युटोपियन कारखाना आणि राजकीय क्षेत्रात एक दबदबा असलेल्या परिचारक घराण्याचे नाव मात्र यानिमित्ताने चर्चिले जाऊ लागले आहे हे नाकारता येणार नाही.
या संदर्भात युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतू दूरध्वनीला अपेक्षित उत्तर मात्र मिळू शकले नाही.
प्रक्रियेला स्थगिती
सदरहू दिवाळखोरीची कारवाई करण्यासाठी एका वृत्तपत्रात नोटीस प्रकाशित करण्यात आली होती परंतु न्याय मागण्याची मुभा असल्याने कारखान्याने त्यावर हे कर्ज परतफेड करणे किती सहज सुलभ, शक्य आहे हे पटवून देत न्यायालयाकडे यावर स्थगिती मिळवण्याची याचना केली. त्यावर तातडीने निर्णय करत या दिवाळीखोरीच्या कारवाईवर स्थगिती मिळाली असल्याचे समजते.