“त्या मुलीची जात…”, कोयता हल्ल्यातून तरूणीला वाचवणाऱ्या लेशपालच्या इन्स्टा पोस्टनं वेधलं लक्ष

पुणे | Pune News – सदाशिव पेठेत भरदिवसा एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. भररस्त्यात एका तरूणानं हातात कोयता घेऊन तरूणीचा पाठलाग करत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी अनेक लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. पण, लेशपाल जवळगे (Leshpal Javalge) या एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरूणानं जीवाची पर्वा न करता हल्ला करणाऱ्या नराधमाला पकडून मुलीचा जीव वाचवला. त्यामुळे सध्या लेशपालच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. या दरम्यान, लेशपाल जवळगेनं एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे जी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

लेशपाल जवळगेनं केलेल्या या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकानं त्याचं कौतुक केलंय. अशातच, लेशपालला इन्स्टाग्रामला काही विचित्र मेसेज येऊ लागले आहेत. या हल्ला करणाऱ्या मुलाची जात काय होती? त्या मुलीची जात काय होती, असे प्रश्न त्याला विचारले जात असल्याचा दावा लेशपालनं केला आहे. यासंदर्भातली एक स्टोरी त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ठेवली आहे.

लेशपालनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, “मला त्या मुलाची आणि मुलीची जात कुठली आहे, असं DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला.” सध्या लेशपालच्या या स्टोरीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Sumitra nalawade: