महात्मा गांधीजींचा अपमान सहन केला जाणार नाही

संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्र्यांकडून निषेध

मुंबई | Devendra Fadnavis – संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या विधानावरून राज्यभर वातावरण तापले असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही’, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली.

त्यांच्या या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकांना अशाप्रकारचे वक्तव्य सहन होणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘जसं काँग्रेस याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे त्याचप्रमाणे जेव्हा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले तेव्हादेखील त्यांनी आंदोलन करायला हवे होते.’ मात्र तेव्हा काँग्रेसचे लोक मिंधे होऊन बसले होते, असा टोला देखील फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला. तसेच कोणाहीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन केले जाणार नाही, मग ते महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, असेही ते म्हणाले.

महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तसेच भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करू नये.
— देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

‘जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही’. त्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे. त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने आत्मघातकी आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने ते रोज नवीन नवीन काहीतरी बोलतात. यावर आवर घातला पाहिजे.
— छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

आम्ही संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करा म्हणून आग्रह धरला तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. संभाजी भिडेंवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
— यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या

admin: