घुसमट आणि अस्वस्थता हेच वास्तव

शेतकऱ्याचं हातचं रूमणं कोणी काढलं नाही

शहाजीराव बळवंत, ज्येष्ठ साहित्यिक

शेतकऱ्यांच्या हातातील रुमणे कोणी काढून घेतले नाही. त्याच्या हातातील नांगर कोणी थांबवला नाही. तसेच लिपिकांच्या हातातील लेखणी कोणी थांबवली नाही. अंधाऱ्या रात्री, गावाच्या बाहेर झाडाआड चालणारं प्रियकर न् प्रेयसी यांचे गोड गुंजन कोणी रोखले नाही.

राजमितीस जगात मोजक्याच देशात राजेशाही आहे. कालौघात नवे नवे विचार पुढे आले, जुन्या जनपदापासून अन् गणराज्यापासून त्यातील विचार घेऊन, राज्यकारभाराची लोकशाही पद्धत अस्तित्वात आली. स्वातंत्र्य, समता, बंधुता या उदात्त विचारांचा अन् तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला. लोकशाहीत लोकांनी लोकांकडून लोकांसाठी राज्य करावे, ही सार्थ अपेक्षा बाळगण्यात आली. पक्षीय पद्धतीने निवडणुका होऊन राजा राजाच्या पोटी जन्मास न येता तो मतपेटीतून जन्मास येऊ लागला. तरीपण लोकांमधील अस्वस्थता, दैन्य, दारिद्रय काही संपले नाही. शेतकर्‍यांचे हाल काही केल्या संपेना, त्याच्या आत्महत्या थांबेनात. आज नांगराऐवजी तो ट्रॅक्टरने जमीन नांगरू लागलाय. आधुनिक यंत्राने शेतीची व पिकांची मशागत करू लागलाय.

नवीन धवलक्रांती व हरितक्रांती त्याने जन्मास घातली आहे. परंतु याचं श्रेय, राजाला किंवा लोकशाहीतील प्रधानाला जात नाही, हा विज्ञानाचा व औद्योगिक क्रांतीचा चमत्कार आहे. राजा किंवा राज्यकर्ता नांगरणी थांबवू शकत नाही, त्याची आत्महत्या रोखू शकत नाही. तो त्याला झुलवत आहे. काही लोक म्हणतात, बळीराजा आता जागा झाला आहे. तो संघटित होऊ लागला आहे. या नव्या कृषिक्रांतीमुळे त्याचा उद्धार आता दृष्टिपथात आला आहे. आम्ही आयोग नेमू, पहिल्या नेमलेल्या आयोगाची अंमलबजावणी करू. त्याचे कर्ज माफ करू, त्याला बी-बियाणे मोफत देऊ, पीक कर्जाचे वाटप करू, शेततळ्याला अनुदान देऊ, त्यानं पिकवलेल्या मालाला उचित मूल्य देऊ, राज्यकर्ता म्हणतो त्याच्या शेतमालाला दीडपट भाव दिला का त्याचा उद्धार होणारच. शेतकर्‍याच्या हातात पैसा खुळखुळायला लागला का तो शेतमजुरांना वाढीव मजुरी द्यायला मागे-पुढे पाहणार नाही. त्याच्या आर्थिक विकासातच, कृषी उद्योगात काम करणार्‍या घटकांचे आर्थिक हित लपले आहे.

त्याच्या मूळ अडचणींकडे या पंचाहत्तर वर्षांतील लोकशाहीत व त्यांच्याअगोदर राजेशाहीत कोणाचेही लक्ष गेले नाही, ही बाब पण तितकीच खरी आहे. कोणे एकेकाळी एका मुस्लिम शेरशहा सुरीने शेतकर्‍यांना त्याची जमीन मोजून दिली, असे इतिहासात मुलांना शिकवतात. तिची मोजदाद व वर्गवारी त्याने स्वत:चा महसूल व राज्याचे उत्पन्न वाढावे, म्हणून करून दिली होती. ही प्रतवारी पुढे इंग्रज लोकांनीही केली, त्याला खालसा लावून स्वतंत्र ७/१२ करून दिला. यात इंग्रजांचा हेतू काही शेतकर्‍यांच्या हिताचा नव्हता, तो महसूल वाढवण्याचाच होता. त्यांनी जमीन महसूल अधिनियम आणला अन् शेतकर्‍यांचा अन् तलाठ्यांचा, मोजणी खात्याचा संबंध वाढवला. अपील पद्धत आणून त्यांनी त्याला कोर्टाची पायरी दाखवली. आजही त्यांच्या शेतीची कागदपत्रे अद्ययावत नाहीत. ही इंग्रजांचीच देन आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत ६० ते ७० या दशकात राज्यांनी तुकडेजोडे व तुकडेबंदी कायदा आणला खरा, परंतु तो यशस्वीपणे राबवता आला नाही. तेव्हा झालेल्या वा केलेल्या चुका शेतकरी आजही भोगत आहेत. त्या चुका शासनाच्या परंतु शेतकर्‍यालाच तलाठी कार्यालय, मोजणी कार्यालय जमाबंदी आयुक्तालय ते मंत्रालय येथे खेटे घालावे लागत आहेत. अपिलावर अपिलं करून तो मेटाकुटीस आला आहे. चुका शासनाच्या अन् अपिलांचा खर्च, वरखर्च व वकीलखर्च मात्र शेतकर्‍यांचा.

शेतकर्‍यांमधून एखादा मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला तर चौथ्या स्तंभाचे रखाणेच्या रखाणे गुणगौरवाने भरले जातात. मी शेतकरी आहे, असे तोही छाती फुगवून सांगतो. अलिकडे शेतकर्‍यांची मुलंही जिल्हाधिकारी होताहेत. तीही आपलं कौतुक करून घेताहेत, परंतु त्याच्या शेतीचं अद्ययावतीकरण करून घ्यावं, विनाकारण होणारी अपीलं बंद करावीत. त्याच्या शेतीला पाणी अन् धान्याला भाव द्यावा हे त्यांच्या लक्षात येत नसावं. शेतकरी मात्र कपाळाला हात लावून, आशेनं त्यांच्याकडे बघतोय. हातातलं रुमणं त्यांच्या सुटत नाही.

सध्याचं युग संगणकाचं, डिजिटल इंडियाचं, लिपिकाच्या हातातली लेखणी काही थांबत नाही. ती कोणी राज्यकर्ता हिरावून घेत नाही. लेखनिक मात्र पहिल्यासारखाच हातात पेन घेऊन संगणकावर बसलेला दिसतोय. ‘देनेवाला तेरा भला, न देनेवाला तेराही भला’ अशी आस धरून तो बसलेला आहे. पेटी अन् खोकी यांच्या काळात तो म्हणतोय, माझं बचकेचं नाही कांडीचं खाणं आहे. याच्यावर कोणी कितीही वैतागलं तरीही हा शांत असतो. वरच्या साहेबांकडं लाचारीनं पाहतच बसतो. टिप्पणी यानंच लिहायची, फाईलचा सारांश यानंच साहेबांना समजून सांगायचा, साहेबांच्या मनातलं याला कळतं. ते ओळखूनच अनुकूल टिप्पणी सादर करायची. साहेबांना काही कळेना असं झालं का यानंच त्यांच्याशी चर्चा करून विषय समजून घ्यायचा. असं याचं सारंच धीराचं असतं. याचं काम थांबत नसतं.

असंच आहे प्रेमाचं. खरं प्रेम राजा अन् राज्यकर्ता रोखू शकत नाहीत, अडवू शकत नाहीत, थांबवू शकत नाहीत. लिव्ह-इन-रिलेशनशिपमधल्या जोडीदाराला कोर्टाला पण पोटगी मंजूर करावी लागते. प्रेम अन् प्रेमाची भाषा चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. अनेक उदाहरणाने ती सिद्ध झाली आहे.

Sumitra nalawade: