ओतूरमध्ये कचरा समस्येमुळे रोगराईला आमंत्रण

ओतूर : महामार्गालगत टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्‍यामुळे प्रवासी व स्थानिक व्यावसायिक नागरिकदेखील हैराण झाले आहेत. या दुर्गंधीयुक्त कचर्‍यामुळे प्रवासी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाला आहे. हा कचरा लवकर उचलण्यासाठीची मागणी सामान्य जनतेतून होत आहे.


ओतूर (ता.जुन्नर) येथील बदगीचा ओढा नगर-कल्याण महामार्गालगत पूर्णतः कचर्‍याने भरला आहे. गावातील हॉटेल व्यावसायिकांकडून उर्वरित पदार्थ येथे फेकले जातात. याचा त्रास परिसरातील व्यावसायिक दुकानदारांना तथा महामार्गावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांना होतोय. सुक्याबरोबर ओलाही कचरा येथे टाकला जात असल्याने त्याची कुजून दुर्गंधी फैलावत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रात्रीच्या वेळी उशिरा या ठिकाणी कचरा फेकला जात असल्याने कधीकधी घाईत रस्त्यावरदेखील हा कचरा फेकला जातो. पादचारीदेखील या कचर्‍याच्या दुर्गंधीने हैराण आले आहेत.


पुणे-नाशिक व नगर-कल्याण या दोन महामार्गांवर टाकला जाणारा हॉटेल व्यावसायिकांचा कचरा, भाजीपाल्याचा कचरा तसेच मांस विक्री दुकानांचा दैनंदिन कचरा गावोगावी महामार्गालगत टाकला जातोय. विशेष म्हणजे यांना कोणाचेही भय नाही. अगदी दारूच्या बाटल्यादेखील अनेक ठिकाणी फेकल्या जातात. यामुळे परिसरातील रहिवासीदेखील हैराण झाले आहेत. तालुक्यात प्रमुख गावांतील बसस्थानक आणि परिसर तर जणू कचरा फेकण्याची ठिकाणं आहेत की काय? या परिसरात अक्षरशः राजरोसपणे कचरा फेकला जातो. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न होत चाललाय.


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दैनंदिन या समस्येला सामोरे जावे लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतीकडून कचर्‍याच्या गाड्या हा कचरा नेत नसल्यामुळे कचर्‍याचे ढिगारे जसेच्या तसे कुजून रोगराई व दुर्गंधी पसरवत आहेत.

व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक यांचीदेखील जबाबदारी असल्याने अशाप्रकारे अस्ताव्यस्त कचरा टाकू नये. लवकरच ओतूर येथे अद्यावत कचरा प्रकल्प होणार असल्याने अजून काही दिवस या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. तरी लवकरच यावर ठोस पाऊल उचलून उपाययोजना करणार आहोत.
गीता पानसरे, सरपंच, ओतूर

कचरा समस्या सगळ्यांना भेडसावते आहे. परंतु कचरा व्यवस्थापनावर योग्य दिशेने पाऊल पडत नाहीत. स्थानिक ग्रामपंचायतीने हा कचरा गोळा करून या त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
विजय वायकर, सामाजिक कार्यकर्ते

Sumitra nalawade: