जयपूर : (IPL 2023 RR Vs RCB) आयपीएल 2023 चा 60 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीला खेळण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी सावध सुरूवात करत 6 षटकात 42 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली बॉल टू रन पद्धतीने खेळत होता. तर फाफा ड्युप्लेसिसने 19 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.
पॉवर प्ले नंतर आरसीबीने लगेच आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर आसिफने विराट कोहलीला 18 धावांवर बाद केले. विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 69 धावांची भागीदारी रचली. ड्युप्लेसिसने हंगामातील आपले सातवे अर्धशतक ठोकले. मात्र केएम आसिफनेच ड्युप्लेसिसला देखील 55 धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.
ड्युप्लेसिस 55 धावांवर बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 14.5 षटकात 2 बाद 119 धावा झाल्या होत्या. मॅक्सवेलने 40 धावा करून एक बाजू लावून धरली होती. मात्र राजस्थानने आरसीबीला पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. झाम्पाने महिपाल रोमरोरला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर याच षटकात झाम्पाने दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद करत आरसीबीची अवस्था 2 बाद 119 धावांवरून 4 बाद 120 धावा अशी केली.
आरसीबीने अवघ्या 1 धावेत 3 फलंदाज गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने संघाला आधार दिला. त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र संदीप शर्माने मॅक्सवेलची ही अर्धशतकी खेळी 18 व्या षटकात संपवली. त्याने 56 धावांवर मॅक्सवेलचा त्रिपळा उडवत आरसीबीला पाचवा धक्का दिला.
विराट कोहली 19 चेंडूत 18 धावा, फाफ डु प्लेसिसनं 44 चेंडूत 55 धावा, महिपाल लोमरोर 2 चेंडूत 1 धाव तर दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. तर ग्लेन मॅक्सवेल 33 चेंडूत 54 बाद झाला. मायकेल ब्रेसवेल 9 चेंडूत 9 धावांवर नाबाद खेळी केली. अनुज रावत 11 चेंडूत 29 धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 20 षटकांत आरसीबीनं 171 धावांची मजल मारली अन् राजस्थानसमोर 172 धावांचे आव्हान दिलं आहे. केएम आसिफ अन् एडम झंम्पाने प्रत्येकी 2 बळी घेतले तर संदिप शर्माने 1 बळी घेतला.