मुंबई | Sanjay Raut – मुंबईमधील कोविड सेंटर घोटाळा (Mumbai Covid Centre Scam) प्रकरणी आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल ( Iqbal Singh Chahal ) यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. कोविड सेंटरसंदर्भातील व्यवहारांचे कागदपत्रं घेऊन चहल यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चहल यांची पाठराखण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांमधील परिस्थितीचा संदर्भ देत भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.
यावेळी संजय राऊतांनी कोरोना कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक व्यवहार झाल्याचा दावा केला. कोवीड काळात गुजरातमध्ये रुग्णालयात जागा मिळत नव्हत्या. उत्तर प्रदेशामध्ये गंगेत प्रेतं वाहत होती, अशी टीका करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. सध्या सर्व यंत्रणा केंद्राने ताब्यात घेतल्या आहेत. या सरकारच्या काळात बदनामीच्या मोहीमा राबवल्या जात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
कोवीड काळात मुंबईत डॉक्टर आणि नर्सेस पळून जात होते पण यूपीप्रमाणे मुंबईमध्ये नदीत मृतदेह तरंगले नाही. अशा परिस्थितीही पादर्शक काम झालं, असं राऊत म्हणाले. सर्व यंत्रणा केंद्राने ताब्यात घेतल्या असून न्यायव्यवस्थेवर घाला घालण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, असंही राऊत यांनी भाजपावर टीका करताना म्हटलं आहे.