मुंबई | Rutuja Latke – ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसंच ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे.
ऋतुजा लटके यांनी आज (12 ऑक्टोबर) महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर नेमका काय निर्णय घ्यायचा याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल, असं इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे.
ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 30 दिवस म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत राजीनाम्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा दिल्याशिवाय ही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.