“…म्हणून सरकार संजय शिरसाटांना पाठिशी घालतंय?”, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

मुंबई | Supriya Sule – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईनं काय-काय लफडी केली आहेत ते तिलाच माहिती, अशी टीका संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.”

“छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, “त्यात ही बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.”

“आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी”, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Sumitra nalawade: