नवी दिल्ली : (Isha Gupta On Woman Reservation Bill) आज महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडलं. नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. महिला आरक्षणाच्या विषयाला आमच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी आज सभागृहात सांगितलं. त्यानंतर अभिनेत्री इशा गुप्ताने प्रतिक्रिया दिली आहे.
इशा गुप्ता म्हणाली, “पंतप्रधान मोदींनी केलेली ही एक चांगली गोष्ट आहे. हा एक अतिशय प्रगतीशील विचार आहे. यापूर्वीही मोदी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओसारख्या अनेक योजना महिलांसाठी राबवल्या आहेत. या आरक्षण विधेयकाने महिलांना समान अधिकार मिळतील. महिलाच महिलांचा त्रास समजू शकतात. असं म्हणतात की ज्या घरातील लक्ष्मी खूश असते, ते घर खूश असतं. मोदींनीही तेच केलं आहे, याची सुरुवात त्यांनी लक्ष्मीपासून केली आहे. आपला देश खूप पुढे जाईल.”
“ही आपल्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लोक ज्या गोष्टीचा फक्त विचारच करतात, त्या गोष्टी मोदींनी प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत. या विधेयकामुळे देशभरातील महिलांना दिलासा मिळाला आहे,” असं इशा म्हणाली. यावेळी आपल्याला राजकारणात यायचं आहे, असंही तिने नमूद केलं.