पिंपरी : वन्यप्राण्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने वनविभागाचे कार्य आव्हानात्मक आहे, तसेच ते गौरवास्पदही आहे. ‘लम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव इतर प्राण्यांना होऊ नये, यासाठी शासन लसीकरणावर भर देत आहे, ही जमेची बाजू आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्था, महाविद्यालय, महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, तसेच वनपरिक्षेत्र वडगाव मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक वन्यजीव सप्ताह उपक्रमा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वनविभाग वडगाव मावळ परिक्षेत्राचे वनअधिकारी हनुमंत जाधव, एच. ए. खटके, एम. बी. दाते, डी. बी. ठोंबरे, टी. ए. ढेंबरे, जिगर सोळंकी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष नीलेश गराडे, संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष गणेश मिसाळ, बीबीए बीसीए विभागाच्या प्रमुख प्रा. विद्या भेगडे, इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रमोद बोराडे, वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की वन्यजीवांना माणसांपासून अनेक प्रकारचे धोके आहेत. प्राण्यांची आयात आपण आपल्या स्वार्थासाठी करत आहोत. आज जवळपास ८५ जातींचे पक्षी नामशेष झाले आहेत.
हनुमंत जाधव यांनी गिधाडे, बिबट्या, गवा, घुबड आदी मावळातील प्राण्यांची ओळख करून दिली. प्राण्यांची अन्नसाखळी विस्कळीत झाल्याने ते जंगलाबाहेर येतात. वडगाव मावळमध्ये नीलेश गराडे यांची ‘वन्यजीवरक्षक मावळ संस्था’ शासनास सहकार्य करीत असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली. गणेश मिसाळ म्हणाले, वन्यजीवरक्षक संरक्षणाची भूमिका मावळ तालुक्यात उत्कृष्टपणे निभावत आहे. एम. खटके यांनी वन्यजीव अधिनियमन १९७२ नुसार कायद्यातील तरतुदीनुसार प्राण्यांना अभय दिले गेले.