पुणे | Udayanraje Bhosale – काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा अनेक पक्षांनी निषेध केला आहे. तसंच आता भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होणार असल्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचंही म्हटलं जात आहे. यादरम्यान, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज (28 नोव्हेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी उदयनराजे म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणचा इतिहास मांडणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे उदयनराजे भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं? शिवरायांचा अपमान होतो तेव्हा दु:ख होतं, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराजांचं नाव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्यपालांवर कारवाई का केली नाही. अशी विचारणादेखील उदयनराजे यांनी यावेळी केली. तसंच, 3 डिसेंबरला रायगडावर धरणं आंदोलन करणार असल्याची माहितीही उदयनराजेंनी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असल्याचंही ते म्हणाले.
View Comments (0)