पुणे | पुण्यातील गणेशोत्सव (Pune Ganesh Festival) आणि महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांची नेहमीच जगाला भुरळ पडली आहे. पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतही हे मर्दानी खेळ पाहायला मिळतात. महिला आणि तरुणीदेखील या खेळांमध्ये हिरिरीने सहभागी होतात. दरम्यान, यंदा या मिरवणुकीत एक परदेशी महिलादेखील मर्दानी खेळ खेळताना दिसली. अॅना मारा असं या तरुणीचं नाव असून ती काही दिवसांपासून पुण्यात आहे. खास शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्यासाठी ती आणि तिची मैत्रीण बेली गंधार पुण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अॅना मारा आणि बेली गंधार या दोन युरोपीयन मुलीनी खास मर्दानी खेळाची प्रशिक्षण घेण्यासाठी युरोपातून पुणे गाठलं होतं. दोन दिवस पुण्यात मुक्काम केला आणि मर्दानी खेळ शिकून घेतले होते. बेली गंधार ही मुळची स्पेन देशाची आहे तर ॲना ही इटलीची आहे. दोघीही सुंदर नृत्य करतात. महाराष्ट्राची संस्कृती अनेकांना आकर्षित करणारी आहे. त्यामुळे या संस्कृतीचं आकर्षण या दोघींनाही आहे. शिवाजीराजे मर्दानी आखाडा या इस्टाग्राम पेजवर त्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा अशा साहसी खेळांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांना शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्याची इच्छा झाली. त्यानुसार त्या शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्यासाठी थेट पुण्यात आल्या आणि दोन दिवस राहून शिकल्या होत्या. अॅनाने गुरुवारी (28 सप्टेंबर) पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan 2023) आपलं कौशल्य दाखवत पुणेकरांची मनं जिंकली.