बारा वर्षांची होते तेव्हापासून ‘पोस्टमाॅर्टेम’ करतेय. आधी खूप भीती वाटायची. रात्र-रात्र झोप यायची नाही. पण नंतर जिद्दीने मी माझ्या भीतीवर मात केली. ‘मृतदेहांची भीती मी वाटून घेतली असती तर माझं कुटुंब वाऱ्यावर पडलं असतं. माझ्या पाठच्या भावंडांची शिक्षणं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा झाला असता? मागील २४ वर्षांपासून ‘पोस्टमाॅर्टेम’ करणाऱ्या व अंधारावर मात करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोरच्या शीतल रामलाल चव्हाण .
शीतलचे वडील उपजिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचारी आणि शवविच्छेदनात सहायक म्हणून काम करायचे. आई मोलमजुरी करून संसाराला हातभार लावायची. भावंडांमध्ये मीच मोठी होते. माझ्यासह पाच बहिणी आणि दोन भाऊ असं आमचं कुटुंब. माझं शिक्षण दहावीपर्यंत झालं. पुढं खूप शिकावं वाटंत होतं. पण जमलं नाही. अशातच एक दिवस वडिलांसोबत मी जिल्हा रुग्णालयात गेले होते. वडिलांनी मला शवागारात नेलं. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून मी मृतदेह पाहत होते. पहिल्यांदा तर भीती, किळस अशा भावना दाटून आल्या. मात्र आपल्याला भीती वाटून चालणार नाही. शिक्षणाअभावी दुसरं काही काम मिळण्याची शक्यताच नव्हती. मग वडिलांच्यासोबत राहून शवविच्छेदनाचं काम शिकून घेतलं. प्रत्येकाच्या मनात भीती असते. पण, आपण त्यावर कशी मात करतो ते महत्त्वाचं असतं. मनातून भीती काढली अन् आता कित्येक मृतदेहांचे मी पोस्टमाॅर्टेम केेले आहे.
समाजामध्ये वावरत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. वयाच्या सहाव्या वर्षापासून शवविच्छेदन क्षेत्रात कार्यरत आहे. कुटुंबीय व नागरिकांच्या सहकार्याशिवाय या क्षेत्रात काम करणे कठीण आहे. संकटांनी कणखर बनत गेले, काम हेच आपले कर्तव्य आहे, हे जाणल्याने या क्षेत्रात नावलौकिक मिळवता आला.
— शीतल चव्हाण
या क्षेत्रात काम करताना नजर मरून गेलेली असली तरी कधी कधी मन मात्र व्यथित होतं. दगडावर डोकं आपटून केलेली नवजात बाळाची हत्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीनं केलेली आत्महत्या हे दोन प्रसंग आजही माझं मन हेलावून टाकतात. या दोन मृतदेहांचं विच्छेदन करणं मानसिक-भावनिकदृष्ट्या कठीण होतं.
ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरुषांचाही थरकाप उडतो, अशा शवविच्छेदन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे भोर येथील शीतल रामलाल चव्हाण या युवतीने. विशेष म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षापासून ती या क्षेत्रात कार्यरत असून, शीतलने आतापर्यंत सहा हजारांहून अधिक मृतदेहांचे विच्छेदन केले आहे.
मृत्यू अटळ आहे. परंतु मृत्यू जर अनैसर्गिक असल्याचा संशय असल्यास तो कशा प्रकारे झाला, हे जाणून घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा व कायदेशीर प्रकार म्हणजे शवविच्छेदन. शवविच्छेदन करायचे म्हटले की पुरुषही द्र्रव्यरूपी प्रसाद घेतल्याशिवाय कामास तयार होत नाही; पण असे असतानाही अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांसोबत शवविच्छेदन करण्याकरिता मदतीसाठी जाणाऱ्या शीतल चव्हाण हिने नोकरीचा हाच मार्ग निवडला. सध्या पुणे जिल्ह्यातील भोर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या शीतलने वडिलांच्या निधनानंतर वयाच्या बाराव्या वर्षी शवविच्छेदनाचे काम करून कुटुंबाचा चरितार्थ सुरू केला.
२४ वर्षांचा काळ लोटला तरी शीतलचे हे काम अवितरपणे सुरू आहे. एकदा या क्षेत्रात उतरल्यानंतर त्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते. परंतु शीतलने वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांकडून याचे धडे घेतले होते. आजवर तिने सहा हजारांहून अधिक मृतदेहांचे विच्छेदन करत अनोखा विक्रम रचला आहे. शीतलला तिच्या बहिणी गुड्डी, सुप्रिया व लहान भाऊ रोहन हे शवविच्छेदनसाठी मदत करतात.
शवविच्छेदन करणाऱ्या शीतल चव्हाण यांच्या जीवनावर लघुपट बनविण्यात आला आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या मांढरदेव येथील दुर्घटना, भाटघर धरणातील होडी उलटून झालेली दुर्घटना यांसारख्या अनेक घटनांची साक्षीदार होत शीतलने मृतदेहांच्या विच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.अनेक पुरस्कारांनी गौरव शीतलने आजवर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून शासनाने तसेच विविध समाजसेवी संस्थांनी डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार, झाशीची राणी पुरस्कार, सावित्री समता पुरस्कार, दुर्गामाता पुरस्कार असे विविध मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नुकताच तिला पुणे येथील आबा बागुल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
शवविच्छेदनासारख्या क्षेत्रातही आपल्या कार्यकतृत्वाचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या अन् शवविच्छेदन कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या शीतल चव्हाण या नवदुर्गेच्या कार्याला सलामच करावा लागेल. शवविच्छेदनसारख्या क्षेत्रामध्ये स्त्री म्हणून कार्य करणे आजच्या समाजाच्या दृष्टीने अवघड आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी मक्तेदारी निर्माण केल्यास एक आगळावेगळा विक्रम घडत असतो. चुलीच्या पलीकडेही एक आव्हान आहे, हे जाणून कार्यरत राहिल्याने व यामधून समाजाची सेवा घडत आहे.