मी व्यवसायाने मानसशास्त्रीय समुपदेशक आहे. मानसशास्त्रीय समुपदेशन करताना पदोपदी जाणवायचं की, आपल्या देशात मुलांची शैक्षणिक बुद्धिमत्ता उत्तम असली तरी त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांवर असलेला ताण, त्यातून येणारं नैराश्य, हिंसा, आत्महत्या याचं प्रमाण वाढायला लागलेले आहे. यामागची कारणं शोधत बसण्यापेक्षा हे सगळं कमी करण्यासाठी मी काय करू शकते, असा विचार मी करायला लागले तेव्हा जाणवलं, की चार-दोन वर्कशॉप्स आणि भाषण यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. याच अस्वस्थतेतून माझ्या आईच्या देणगीतून तिच्याच नावाने सुरू केलेली ‘डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन’ ही संस्था जन्माला आली. या संस्थेचा पहिला प्रकल्प म्हणजे ‘प्रोजेक्ट अस्मि.’ अस्मिचा अर्थ ‘मी आहे’ म्हणजे स्वतःचा स्वीकार.
मूल अगदी शाळेत आल्यापासून ते त्यांचं शालेय जीवन संपेपर्यंत सातत्याने त्यांचा भावनिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तरच त्यांच्यात बदल घडतील, हे लक्षात आल्यावर मी काही मानसतज्ज्ञांना एकत्र केलं. भरपूर चर्चा, अभ्यास, चिंतन यातून इयत्ता पहिलीसाठी ‘प्रोजेक्ट अस्मि’ च्या गंमतसत्रांची म्हणजेच अभ्यासक्रमाची निर्मिती झाली. सहा वर्षांच्या मुलांचा सर्वांगाने विचार करून ही सत्र लिहिलीत खरी, पण ती शाळा शाळांमध्ये जाऊन घेणार कोण? म्हणून मग सोशल मीडियाद्वारे लोकांना ‘प्रोजेक्ट अस्मि’ची माहिती, त्याचा उद्देश सांगून आठवड्यातून एक तास मुलांबरोबर घालवण्यासाठी येण्याचं आवाहन केलं.
त्यांना ट्रेनिंग दिलं आणि त्यातून तयार झालेत ‘प्रोजेक्ट अस्मि’चे फॅसिलिटेटर्स. मुलांचे मित्र बनून त्यांना एक तास भरभरून आनंद द्यायचा आणि त्यांची निरागसता चैतन्य घेऊन यायचं, हा असा आमचा देवाणघेवाणीचा सौदा आहे. मुलांना शिकवण्याच्या अविर्भावात राहायचं नाही, ही ‘प्रोजेक्ट अस्मि’ची अट आहे आणि मानसतज्ज्ञांनी आखून दिलेली चौकट मोडायची नाही हा नियम आहे. बाकी सत्र घेताना प्रत्येकाला आपली सृजनशीलता वापरण्याची मुभा आहे. एक तासाच्या प्रत्येक सत्राचं वेगळं उद्दिष्ट ठरलेलं असतं जे त्या एक तासाच्या गोष्टी, गाणी, खेळ, गप्पा यातून अगदी सहजपणे मुलांच्या मनात झिरपतं. जे झिरपतं ते आयुष्यभर टिकतं हे काही वेगळं सांगायला नको.
२०१९-२० या वर्षात ‘प्रोजेक्ट अस्मि’ने महाराष्ट्रातल्या ३५ शाळांमध्ये काम केलं. सुमारे हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांनी या प्रकल्पाचं खूप कौतुक केलं. काही शाळांमध्ये तर शेवटल्या सेशनच्या दिवशी फॅसिलिटर्सचे उत्स्फूर्त सत्कार झाले. अगदी भारावून जावं, अशीच ही स्थिती होती. कारण मुलं आमच्याकडे व्यक्त होत होती, त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगत होती. शाळा अभ्यासाच्या पलिकडे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडण्याचा ही सहजसुंदर प्रोसेस सुरू झाली होती. फर्ग्युसन महाविद्यालयाने त्यांच्या मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी ‘प्रोजेक्ट अस्मि’ चे काम करायला परवानगी दिली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मानसशास्त्र आपल्या वागण्या-बोलण्यात आणण्याची, अंतर्मुख होऊन स्वतःत बदल घडवण्याची संधी मिळाली आणि लहान मुलांना या ताई दादांमधे एक रोल मॉडेल दिसलं. पण… अचानक कोविडने हा सगळाच प्रवास थांबवला.
‘प्रोजेक्ट अस्मि’ने हा प्रवास थांबवण्यापेक्षा दुसरी वाट पकडली आणि ‘अस्मि गंमत कट्टा’ हे यूट्यूब चॅनेल सुरू केलं. एक छानशी गोष्ट दर रविवारी मुलांना सांगायची आणि त्या गोष्टीत सांगितल्यासारखी एखादी छानशी ॲक्टिव्हिटी मुलांना करायला द्यायची. जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवायला नको आणि प्रत्यक्ष कृती करण्यात त्याचा विचार करण्यात मुलांचा वेळ कारणी लागावा, हा त्यामागचा हेतू. मुलांचा भावनिक आणि मानसिक विकास हे आमचं उद्दिष्ट आम्ही यातही पक्कं धरून ठेवलेलं होतं. या चॅनलला पण भरभरून प्रतिसाद मिळाला. गंमत कट्टा अस्मि… हे गोड टायटल साँग मुलांच्या आणि त्यांच्या आईबाबांच्याही तोंडी रुळलं. सलग ४० भागांनंतर ‘अस्मि गंमत कट्टाने’ मुलांचा निरोप घेतला.
‘अस्मि थीम स्कूल ‘ हा ऑनलाईन उपक्रमही अतिशय यशस्वी झाला. ऑनलाईन शाळा सुरू झाल्या तेव्हा आम्हीसुद्धा ऑनलाईन सेशन्स घ्यायला सुरुवात केली. कोविडमुळे मुलाच्या मनावर आलेला ताण, ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा शिक्षकांवर आलेला ताण या सगळ्यावर आमची गंमतसत्र हा रामबाण उपाय ठरला.
कोविडनंतर दोन वर्षांनी घराबाहेर पडणाऱ्या मुलांना खऱ्या अर्थाने मोकळं करण्याचं काम प्रोजेक्ट अस्मिच्या ‘अस्मि… कट्टा दोस्तीचा’ या उन्हाळी शिबिराने केलं. ही मुलं आणि त्यांचे आईबाबा आमच्यावर इतके खुश आहेत, की तेही आता आमच्या अस्मि परिवाराचा हिस्सा बनले आहेत.
आता शाळा सुरू झाल्यात. नव्या उत्साहात आम्ही हजारांवर मुलांपर्यंत आम्ही आमचा आनंद पसरवण्याचं काम करतोय. अर्थातच त्यांच्याकडून चैतन्य घेऊन येतोय.
प्रोजेक्ट अस्मिच्या प्रत्येक उपक्रमाला लोकांच्या कौतुकाची थाप मिळते. तिचं काम करायला बळ देते. अशीच एक शाबासकी मला मिळाली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी कथाकथन या विषयावरच्या ‘मन की बात’मध्ये महाराष्ट्रात कथाकथनाची परंपरा सुरू ठेवली, म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. या सर्वोच्च कौतुकाने मी भारावून तर गेलेच, पण जबाबदारीचीही जाणीव झाली.
(शब्दांकन : सारिका रोजेकर)