Jaipur Express Firing – जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलने (RPF Constable) गोळीबार केला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा गोळीबार जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काल (31 जुलै) पहाटे पाचच्या सुमारास झाला. या गोळीबारानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी आरोपी चेतन सिंहची चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयानं 7 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. तसंच न्यायालयाच्या निकालानंतर चेतन सिंहशी नेमकं काय बोलणं झालं? याबाबत त्याचे वकील सुरेंद्र लांडगे यांनी माहिती दिली आहे. ते टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
यावेळी वकील सुरेंद्र लांडगे यांनी सांगितलं की, आरोपी चेतन सिंहशी बोलायला आम्हाला फार वेळ मिळाला नाही. पण आम्ही त्याला विचारलं की नेमकं काय घडलं होतं? त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, मी काहीही केलं नाही. मी गोळीबार केलेला नाहीये. मला काही माहिती नसून मी निर्दोष आहे.
पुढे वकील सुरेंद्र लांडगे म्हणाले की, आज न्यायालयापुढे पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी आम्हाला तपास करायचा आहे. आरोपी चेतन सिंहची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांची वैद्यकीय तपासणी अद्याप बाकी आहे.