‘नाटू नाटू’च्या ऑस्कर विजयानंतर राज्यसभेत जया बच्चन का भडकल्या?

मुंबई | सध्या सगळीकडे आरआरआर सिनेमातील नाटू नाटू गाण्याची चर्चा आहे. या गाण्यानं जागतिक स्तरावर इतिहास रचला आहे. आरआरआर सिनेमातील या गाण्यानं ऑस्कर सोहळ्यात बेस्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळाल्यानं संपूर्ण देशात अतिशय आनंदाचं वाताववरण आहे. अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यसभेतही नाटू नाटूच्या चर्चा पाहायला मिळाल्या आहेत. मंगळवारी राज्यसभेत बोलताना जया बच्चन यांचा पारा चढला. एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर राज्यसभेत असा मुद्दा उठला की तेलुगू चित्रपट RRR ला दाक्षिणात्य चित्रपट किंवा भारतीय चित्रपट म्हणून लेबल लावणं योग्य आहे का? यावर जया बच्चन यांनी बेधडकपणे उत्तर दिले आहेत.

जया बच्चन यांनी ऑस्करमध्ये भारताला मिळालेल्या दोन्ही पुरस्कारांबद्दल शुभेच्छा दिल्या. “फिल्म इंडस्ट्रीतील लोक हे या देशातील सर्वांत महत्त्वपूर्ण राजदूत आहेत. मग ते उत्तर, पूर्व, दक्षिण किंवा पश्चिमेकडून का असेनात.. ते सर्व भारतीय आहेत”, असं त्या म्हणाल्या.

क्षेत्रीय राजकारण करणाऱ्यांनाही त्यांनी यावेळी टोला लगावला. “मला आनंद आहे की आपण इथे देशातील सर्वांत महत्त्वपूर्ण राजदूतांबद्दल, जे फिल्म इंडस्ट्रीतून आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा करत आहोत. ज्या फिल्म इंडस्ट्रीने अनेकदा देशाची मान अभिमानाने उंचावली, तिथून आल्याने मी याठिकाणी अत्यंत गर्वाने उभी आहे. मी एस. एस. राजामौली यांना खूप चांगल्याप्रकारे ओळखते. लेखक के. वी. विजयेंद्र प्रसाद हे केवळ लेखकच नाही तर ते कथाकार आहेत. ते राज्यसभेचे सदस्यसुद्धा आहेत. आपल्यासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब आहे”, असं त्या म्हणाल्या.

Dnyaneshwar: