नवी दिल्ली | आज (6 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (NCP) पक्ष कुणाचा? चिन्ह कुणाचं? या प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. तर या सुनावणीसाठी शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. तर या सुनावणीदरम्यान अजित पवार गटानं जयंत पाटील यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
या सुनावणीदरम्यान जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद अजित पवार गटानं केला आहे. तसंच राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे असल्याचा दावाही अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानं आता आमदारांची संख्या महत्त्वाची आहे, असा दावाही अजित पवार गटानं केला आहे.
30 जून रोजी अजित पवार यांची बहुमतानं अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. तर यापूर्वी पक्षात झालेल्या नियुक्ती पक्ष घटनेला धरून नाहीत. ज्याप्रमाणे संख्याबळ असेल त्यांना पदाधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकारी आहेत, अशी बाजूही अजित पवार गटानं मांडली.
53 पैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावाही अजित पवार गटानं केला आहे. तर विधान परिषदेत 9 पैकी 6 आमदार आणि नागालँडचे 7 आमदार आमच्या सोबत आहेत, असा दावाही अजित पवार गटानं केला.