– भास्कर जाधव
वडिलांकडून समाजकारणाचे धडे गिरवत जयंत पाटील राजकारणात सक्रिय झाले. मोजके बोलणे, साधे राहणीमान, विकसनशील, सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख असणारे जयंत पाटील साहेब हे माझे आदर्श राजकारणातील नेते आहेत. मागील अनेक वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. अभ्यासू, धुरंधर नेतृत्व, दिलखुलास, मोजके बोलणारे, पण बरोबर कार्यक्रम घडवणारे, बुद्धिमान, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची घट्ट वीण विणणारे, शरद पवार साहेब यांनी त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आणि जयंत पाटलांनी कोणताही संकोच न ठेवता त्या निःस्वार्थ मनाने पूर्ण करून दाखवल्या. राज्यात त्यांनी जलसंपदा विभामार्फत मागील अडीच वर्षांत अनेक महत्त्वाची विकासाची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील एकूण पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महाराष्ट्र राज्याला शाश्वत सिंचनाकडून समृद्धीकडे घेऊन जाण्याचा त्यांचा संकल्प होता. राज्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनात वापरता यावे म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यासोबतच शाश्वत सिंचन, जलसंपदेच्या विकासासाठी, प्रकल्पाची सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, पूरनियंत्रण नियोजन करून ही सर्व कामे मार्गी लावायची त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात १२,९५५ कोटी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद त्यांनी करून घेतली होती. महाराष्ट्राला भविष्यात दुष्काळमुक्त करण्यावर त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केले.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेतेमंडळी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. पण पाटील यांनी आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात स्वतःवर साधा एक रुपयाचा देखील डाग लागू दिला नाही. म्हणून इतर पक्षातील नेते देखील त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करतात. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेचे देखील काम ते खूप उत्स्फूर्तपणे पार पाडत आहेत. शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि जयंत पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील जनतेच्या स्वप्नावर पाणी फिरले.