सांगली | Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यपाल व भाजपचे (BJP) लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. “आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीत अधिक भर घालण्याचं काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे. त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा (Mahavikas Aaghadi Mahamorcha) हा सरकारला धडकी भरवणारा असेल,” असंही पाटील म्हणाले. ते आज (16 डिसेंबर) सांगलीत बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, “महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे 100 टक्के एक अजेंडा आहे. जर एखादा बुरुज पाडायचा असेल तर त्या बुरुजाच्या एका- एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाहीत, अज्ञानानं झालेलं नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत.”
“जुना इतिहास पुसून महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. आपल्यापासून नवा इतिहास सुरू झाला पाहिजे असं काही लोकांना वाटतं. त्यासाठी खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचं कारस्थान सुरू केलं आहे,” असाही आरोप जयंत पाटलांनी केला.
ते पुढे म्हणाले, “महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल, कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहेत. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणं मुश्कील करतील”, असंही जयंत पाटील म्हणाले