जिजामाता उद्यानाचा चेहरा बदलणार

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरच्या मध्यवस्तीत असलेल्या जिजामाता उद्यानाची दुरवस्था संपून हे उद्यान नव्याने विकसित करण्याचे मार्ग खुले झाले आहेत. पुणे विद्यापीठांतर्गत सिंंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशिबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणेच्या चमूने जिजामाता उद्यानाची नुकतीच पाहणी केली आणि लँडस्केप आर्किटेक्चरच्या कामाला प्रारंभ केला.

मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह सामान्य नागरिकांशी देखील या शिक्षक, विद्यार्थी आणि वास्तुविशारद समूहाने चर्चा केली. पुढील महिन्याभरात याचा प्रस्ताव नगरपालिकेला सादर करण्यात येणार आहे. येथील सर्च युवर सेल्फी फाउंडेशनच्या माध्यमातून जिजामाता उद्यान विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पंढरपूर नगर परिषदेने ठराव दिल्यानंतर सर्च युवर सेल्फने पुणे विद्यापीठासह अनेक लँडस्केप डेव्हलपिंगच्या संशोधन संस्थांशी संपर्क साधला होता.

विद्यापीठांतर्गत सिंंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशिबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे या समूहाने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. या उद्यानात पंढरपूरच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब उमटावे आणि यानिमित्ताने तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने विकास करण्याचे ठरले.

समूहाने संपूर्ण स्थळाची पाहणी करून तेथे असलेली वॉल कंपाऊंड, विहीर, पाण्याचा निचरा, ड्रेनेज अशा अनेक समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथील काही वास्तुविशारद आणि लँडस्केप डेव्हलपर यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. हे उद्यान सर्च युवर सेल्फच्या माध्यमातून विकसित केले जाणार असून, नगरपरिषदेने त्याला मान्यता
दिली आहे.

Prakash Harale: