ठाणे : (Jitendra Awhad On Eknath Shinde) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर, मुंंब्रा भागातील माजी नगरसेवक विकास आघाडी करून त्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे. आव्हाडांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून खेळी खेळली जात असल्याची चर्चा असून यामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आव्हाड यांनी फोडाफोडीबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले, पैसेवाल्या शिंदे गटातील नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यातून नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरू झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत, असा आरोप त्यांनी समाजमाध्यमांद्वारे केला होता. या आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चेला एकप्रकारे दुजोरा मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे लोकमान्यनगर भागातील पक्षाचे प्रभावी नेते हणमंत जगदाळे यांच्यासह तीन नगरसेवकांचा शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर, कळवा भागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावून पक्षप्रवेश देण्याची तयारी बाळासाहेबांची शिवसेनेकडून सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला हे सुद्धा नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.