मुंबई | Judicial Custody Of Former Minister Bachu kadu – राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांनी 2018 मध्ये एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते.
यावेळी बच्चू कडू यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, 2018 सालच्या एका राजकीय आंदोलनादरम्यान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केलं होतं. तसंच कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सरकारी अधिकारी संघटनेनं दिला होता.