डॉ. प्रकाश भांबुरे, एमबीबीएस, डीपीएम |
भारतात दारू, गांजा, भांग, अफू या अमली पदार्थांचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत भारतात एनडीपीएस अॅक्टखाली ५९,८०६ केसेस नोंदवल्या गेल्या. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे ११,००० केसेस उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत. मुंबईमध्ये इतर महानगरांपेक्षा जास्त म्हणजे ४,७१४ केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.
जगभरामध्ये २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध तस्करीविरोधीदिन म्हणून पाळण्यात येतो. ७ डिसेंबर १९८७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत २६ जून हा दिवस अमली पदार्थविरोधीदिन म्हणून पाळण्यात येईल, असा ठराव मंजूर झाला. अमली पदार्थांच्या सेवनाने रोग्यावर होणार्या घातक परिणामांबद्दल जागरूकता पसरवणे, तसेच अमली पदार्थांच्या विळख्यातून जगाला मुक्त करणे हा यामागील मुख्य हेतू. संयुक्त राष्ट्रांनी १९९१ ते २००० हे दशक अमली पदार्थविरोधी दशक असेल, अशी घोषणा केली होती.
UNODC यांच्या माहितीनुसार एका वर्षामध्ये जगातील जवळपास २७ कोटी लोक हे वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करतात. यावर्षी म्हणजेच २०२२ चा मुख्य विषय आरोग्य आणि मानवतावादी संकटातील अमली पदार्थांच्या आव्हानांना संबोधित करणे हा आहे.
अमली पदार्थांमुळे मेंदूमध्ये रासायनिक बदल घडतात. ज्यामुळे आपले मन, विचार, भावना, जाणीव, वागणे यावर परिणाम होतो. या पदार्थांच्या सेवनाने मनावरील दडपण तात्पुरते कमी होते, मनाला बरे वाटते, परंतु वारंवार सेवनाची सवय शरीराला लागते, यालाच व्यसन म्हणतात. दारू, गांजा, भांग, चरस, अफू, ब्राऊनशुगर, कोकेन, व्हाइटनर, खोकल्याची औषधे, झोपेच्या गोळ्या, तंबाखू, सिगारेट इत्यादी पदार्थांच्या विळख्यात हल्लीचा माणूस अडकलेला आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक व त्याचे अनुकरण करणारे शालेय विद्यार्थी यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण आता स्त्रियांमध्ये झपाट्याने वाढणारे प्रमाण हाही चिंतेचा विषय आहे.
व्यसनाधीन लोकांना स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचे भान नसते. स्वतःबरोबरच समाजाचे आरोग्य व्यसनी लोकांमुळे बिघडत असते, म्हणूनच व्यसनाला मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, तसेच सामाजिक विकार असे म्हटले आहे.
व्यसनाधीन व्यक्तीच्या मानसिकतेची काही ठळक वैशिष्ठ्ये पाहिली तर आपल्या लक्षात येईल, मानसिक आजार व व्यसन याचा किती जवळचा संबंध आहे. आनंद, राग, दुःख, निराशा, अहंकार, लैंगिकता इत्यादी सर्वसामान्य भावना व्यसनी लोकांच्या बाबतीत टोकाच्या असतात.
मनातील नैराश्य, न्यूनगंड, भीती, अस्वस्थता, संशय, स्वतःवरचा राग या त्रासांपासून काही काळ का होईना, सुटका करून घेण्यासाठी ही माणसे व्यसनाकडे वळतात. व्यसनाधीनतेला परिस्थिती, नशीब, कुटुंबीय जबाबदार आहेत असे वाटतेे. ५० टक्के व्यसनाधीन हे नैराश्यग्रस्त, ३० ते ४० टक्के भीती किंवा बेचैनी या आजाराने पीडित असतात, तर १५ टक्के लोकांमध्ये व्यक्तिमत्त्व दोष आढळून येतो, तसेच १५ टक्के व्यसनी लोक आत्महत्या करतात, असे काही सर्वेक्षणाअंती लक्षात आले आहे.
व्यसनमुक्ती हवी असल्यास त्याची लवकर दखल घेऊन मानसोपचारतज्ज्ञांकडून मनोविकार किंवा व्यक्तिमत्त्व दोष यावर उपचार करून घेणे, व्यसनाची तल्लफ कमी करणारी औषधे घेणे, तज्ज्ञांकडून दीर्घ काळ समुपदेशन करून घेत राहणे गरजेेचे आहे.
शब्दांकन : सारिका महाले-रोजेकर