K. Chandrashekar Rao Maharashtra Tours : राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाकडून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्राचे दौरे केले. यावेळी त्यांनी अनेक सभा घेत पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.
दरम्यान, के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राव हे उद्या मंगळवार दि. 01 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहचणार आहे. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. सोबतच ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी दुपारी दोन वाजता के चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर मधील अंबाबाईच्या दर्शनासाठी चंद्रशेखर राव हे जातील आणि तिथून परत हैदराबादला निघतील.
मागील काही दिवसांपासून के चंद्रशेखर राव हे पक्षाच्या वाढीसाठी राज्यात प्रयत्न करत आहे. अनेक महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी ऑफर देखील दिल्या आहेत. आता अशातच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी आपल्या सोबत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये राव यांची भेट घेऊन यापुढे बीआरएससोबत काम करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात रघुनाथ दादा पाटील बीआरएसच्या गोटात सामील तर होणार नाहीत ना? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.